…आणि मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत जयघोषाने रोमांच

…आणि मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत जयघोषाने रोमांच

मुंबई नगरी टीम

चंद्रपूर : जनतेचा उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसाद मिळत असलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनादेश यात्रा चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानात पोहोचली…. मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहिले…. नेहमीप्रमाणेच त्यांनी भारत माता की जय हा जयघोष केला केला….  मात्र आजच्या जयघोषाने रोमांच उभे होत होते. एका विलक्षण अनुभूतीचा प्रत्यय येत होता.  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचे कणखर गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काश्मीर मधून ३७० कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला होता. मुख्यमंत्र्यांनी या ऐतिहासिक निर्णयाची आपल्या भाषणातून वाच्यता करताच “भारत माता की जय” च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.

अशा आनंदाच्या क्षणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आपल्या भागातून जाणार म्हणून अधिकच जोश संचारला होता. आज महाजनादेश यात्रेत सहभागी होणाऱ्यांची छाती अधिकच फुलल्याचे जाणवत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाच्या दरम्यान “भारत माता की जय” या घोषणेला विलक्षण प्रतिसाद होता.स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात भारत माता की जय म्हणताना वेगळ्या अनुभवाची अनुभूती येत असल्याची भावना व्यक्त केली. नंतर ठिकठिकाणी झालेल्या सभांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले, तेव्हा लोकांकडून टाळ्यांचा आणि घोषणांचा अलोट प्रतिसाद मिळत होता.

देवेंद्र फडणवीस अधिक अभिमानाने बोलत होते, जहाँ हुये बलिदान मुखर्जी वह काश्मीर हमारा है, हा लहानपणा पासून आम्ही देत असलेला नारा आज सिध्द झाला. आज केंद्र सरकारने काश्मिरला भारताशी जोडण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आजच्या या निर्णयामुळे काश्मिरला भारतापासून तोडण्याचा पाकिस्तानचा मनसुबा उधळून लावला गेला. कॉंग्रेसने केलेली ऐतिहासिक चूक आज दुरुस्त केली गेल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठिकठिकाणी स्पष्ट केले. आज चंद्रपूर ते यवतमाळ मार्गावर ठिकठिकाणी अलोट गर्दीने महाजनादेश यात्रेच्या स्वागतासोबतच ३७० कलम हटवण्याचा जल्लोशही साजरा केला.

Previous articleबाळासाहेब ठाकरे आणि  अटल बिहारी वाजपेयींचे स्वप्न पूर्ण झाले
Next articleमुख्यमंत्र्यांनी राज्यातील पूर परिस्थितीचा  आढावा घेतला