बाळासाहेब ठाकरे आणि  अटल बिहारी वाजपेयींचे स्वप्न पूर्ण झाले

बाळासाहेब ठाकरे आणि  अटल बिहारी वाजपेयींचे स्वप्न पूर्ण झाले

मुंबई नगरी टीम

मुंबई :  आज एक ऐतिहासिक दिवस आहे .जम्मू काश्मिरमधिल कलम ३७० हटवल्यामुळे काश्मीरबाबत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वप्न पूर्ण झालेले असून,पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आज जगाला दाखवून दिल आहे की, आपल्या भारतामध्ये अजूनही पोलादीपणा टिकून आहे. त्यांचे आज मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि मला याचा सार्थ अभिमान देखील आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

जम्मू काश्मिरमधिल कलम ३७० हटवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला आहे. मातोश्री निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या ऐतिहासिक घटनेचे स्वागत केले. १५ ऑगस्टला अजून वेळ आहे परंतु मी असे म्हणेन की, आज खऱ्या अर्थाने आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला आहे. हा कोणत्याही राजकीय पक्षा पुरता मर्यादित विषय नसून देशाच्या एकसंघपणाचा विषय आहे याचे स्वागत सगळ्या राजकीय पक्षांनी केले पाहिजे असेही उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना आणि भाजपच्या वचननाम्यातील महत्वाचे एक वचन आज पूर्ण झालेले आहे असून,आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वप्न पूर्ण झाले अशी भानवा त्यांनी व्यक्त केली.

 इतक्या वर्ष उराशी बाळगलेले स्वप्न आज पूर्ण झाल्याचे पाहून जर आज बाळासाहेब जिवंत असते तर त्यांना खूप आनंद झाला असता असे सांगून, या निर्णयाबाबत जे कोणी आदळा-आपट करतील किंवा विरोध करतील त्यांचा सामना करण्यासाठी सरकार समर्थ आहे असा इशाराही त्यांनी दिला. काश्मीर हा देशाचा अविभाज्य भाग होता आणि राहील.  राजकारण बाजूला ठेवून देशहिताच्या निर्णयाचे स्वागत करा असे आवाहन त्यांनी राजकिय पक्षांना केले.काश्मिरी पंडित जेव्हा त्यांचे घर सोडून पलायन करत होते. त्यावेळेला पुर्ण हिंदुस्तानात फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांची पाठराखण केली मजबूती दिली आणि त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे असे बाळासाहेबांचे मत होते. मी तमाम शिवसेनेकडून तसेच भारतातल्या आणि जगभरातल्या देशाच्या कट्टर हिंदूंकडून या सरकारचे अभिनंदन करतो असे ते म्हणाले.

Previous articleराष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी नवाब मलिक यांची नियुक्ती
Next article…आणि मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत जयघोषाने रोमांच