नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील यांचे नाव

मुंबई नगरी टीम

मुंबई । नवी मुंबईतील विमानतळास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा आग्रह अखेर शिवसेनेकडून मागे घेण्यात आला असून,या विमानतळास लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील यांचे नाव देण्यास आज मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा आग्रह धरला होता तर तेथिल भूमिपुत्रांनी या विमानतळास लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील नाव देण्याची मागणी करीत तीव्र आंदोलन केले होते.आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे“लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ” असे नामकरण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. नवी मुंबई येथे सिडको महामंडळाच्या माध्यमातून ११६० हे. क्षेत्रावर सार्वजनिक खाजगी भागीदारीतून ग्रीनफील्ड विमानतळ विकसीत करण्यात येत आहे. या संपूर्ण ११६० हे. जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे प्रगतीपथावर आहेत. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या विकासासाठी तसेच त्यांच्या मागण्यांसाठी लोकनेते स्वर्गीय दि.बा. पाटील यांचे योगदान व विविध संघटनांची मागणी विचारात घेता या विमानतळाचे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Previous articleशिवसेनेची वचनपुर्ती : औरंगाबादचे “संभाजीनगर” तर उस्मानाबादचे “धाराशिव” नामांतर
Next articleदोन्ही पक्षांचं सहकार्य मिळालं, पण माझ्या काही लोकांनी दगा दिला : मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत