मी राज्यपाल पदाचा आदर करतो,परंतु कोश्यारींचा नाही; उद्धव ठाकरेंचा टोला

मुंबई नगरी टीम

मुंबई । छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सडक्या मेंदूच्या मागे नक्की कुठला मेंदू याचा शोध घ्यावा लागेल असे सांगतानाच मी राज्यपाल पदाचा आदर करतो,परंतु कोश्यारींचा नाही अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांवर हल्लाबोल केला.मुख्यमंत्री लाचार असल्यामुळे दिल्लीश्वरांच्या कृपेमुळे मुख्यमंत्रीपदी बसले असल्याने त्यांच्यात राज्यपालांच्या विरोधात बोलण्याची हिंमत नाही, मुख्यमंत्री म्हणजे पैचान कोन अशी अवस्था आहे अशा टोलाही त्यांनी लगावला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात वातावरण चांगलेच तापले आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांचा समाचार घेतल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांवर हल्लाबोल केला आहे.सध्याची परिस्थितीकुणी यावे आणि टपली मारून जावे अशी आहे.एकीकडे देशाचे कायदामंत्री न्यायधीशांच्या नियुक्तीत अपारदर्शकता असल्याचे जाहीर विधान करुन न्याय व्यवस्थेवरच प्रश्न चिन्ह निर्माण करत आहेत.राज्यपालांची नियुक्ती ही केंद्रात ज्या पक्षाचे सरकार असते त्यांच्या विचारासरणीच्या व्यक्तींची नियुक्ती केली जाते.याबाबत सुध्दा काही निकष ठरवण्याची वेळ आली असे सांगून,ज्यांना वृध्दाश्रमात सुध्दा कुणी घेणार नाही अश्यांची राज्यपालपदी नियुक्ती होते आहे अशी टीकाही त्यांनी केली.सडक्या मेंदूच्या मागे नक्की कुठला मेंदू याचा शोध घ्यावा लागेल.मी राज्यपाल पदाचा आदर करतो,परंतु कोश्यारींचा नाही असा टोलाही त्यांनी लगावला.सावित्रीबाई फुले,महात्मा फुलेंबाबत आपत्तीजनक विधान केले.त्यानंतर मुंबई, ठाणेकरांच्या बाबतीत तोच प्रकार झाला आणि आता आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची अव्हेलना, अपमान कोश्यारीने केला आहे.मुख्यमंत्री लाचार असल्यामुळे दिल्लीश्वरांच्या कृपेमुळे मुख्यमंत्रीपदी बसले असल्याने त्यांच्यात राज्यपालांच्या विरोधात बोलण्याची हिंमत नाही.मुख्यमंत्री म्हणजे पैचान कोन अशी अवस्था आहे असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.उपमुख्यमंत्री फक्त सारवासारव करत असल्याने याविरोधात महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र याविरोधात आवाज उठवू असे आवाहनही करून केंद्राला जाग येण्यासाठी महाराष्ट्र हा लेच्यापेच्यांचा नाही हे पुन्हा दाखवण्याची वेळ आली आहे.याचा शांततेच्या मार्गाने विरोध करुया असेही ते म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत सविस्तर भूमिका मांडली आहे,परंतु हा विषय आमच्या दैवताशी निगडीत आहे.शरद पवार,उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे यांनीही भूमिका मांडली आहे असे सांगून, भाजपातील महाराष्ट्र प्रेमींनी या विरोधात एकवटण्याचे आवाहन त्यांनी केले.मंत्रिमंडळाची बैठक का रद्द केली ? असा सवाल करून,अपवादात्मक परिस्थितीतच मंत्रिमंडळाची बैठक रद्द करतात.महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ गुजरातच्या प्रचारात व्यस्त आहे.निवडणुका गुजरात राज्यात आहेत पण सुट्टी महाराष्ट्र ही नविन पध्दत निघाली आहे. उद्या पाकिस्तानात निवडणुका असल्यावर पण कदाचित सुट्टी जाहीर करतील असा टोलाही त्यांनी लगावला.कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे महाराष्ट्रातील गावांवर अधिकार सांगू लागले आहेत असे सांगून ही दिल्लीश्वरांची भूमिका आहे काय ? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Previous articleमंत्रीमंडळाची बैठक रद्द, महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ गुजरात भाजपच्या दावणीला
Next articleवादग्रस्त विधान करण्याचा राज्यपालांचा लौकिक; शरद पवार राज्यपालांवर बरसले