मी सुट्टीवर नाही तर डबल ड्युटीवर ; अडीच वर्ष घरी बसलेल्यांनी मला सांगू नये !

मुंबई नगरी टीम

मुंबई । गेल्या दोन दिवसांपासून सातारा दौ-यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रजेवर गेले आहेत. अशी टीका केली आहे.तर मी सध्या सुट्टीवर नाही तर सध्या डबल ड्युटीवर आहे.अडीच वर्ष घरी बसलेल्यांनी मला सांगू नये असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना दिले आहे.आम्ही टीकेला टीकेतून उत्तर देणार नाही तर कामातून उत्तर देणार आहोत. मी कधीही सुट्टी घेतली नाही,असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस सातारा दौ-यावर आहेत.त्यांच्या या दौ-यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.या पार्श्वभूमीवर आज महाबळेश्वर येथे मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांना प्रत्त्युत्तर दिले.सातारा जिल्ह्याच्या दौ-यात मी अनेक लोकांच्या भेटी घेतल्या.जनता दरबारही घेतला.दरे गावात असताना शेतीची कामेही बघतली. सातारा प्रशासनाची आढावा बैठक घेतली.महाबळेश्वर पाचगणी पर्यटन सुशोभीकरण आदी अनेक कामांच्या बैठका घेतल्या असेही त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी आगामी निवडणुका संदर्भातही भाष्य केले. आम्ही अजून दिड वर्षे काम करणार आहोत त्यामुळे आगामी निवडणुकांना महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहोत.गेले सात आठ महिने आम्ही जे काम केले आहे.त्यामुळे काहीजणांच्या पोटात दुखत आहे.अशा शब्दात त्यांनी विरोधकांना टोला लगावला.आम्ही विरोधकांच्या टीकेला टीकेतून उत्तर देणार नाही तर कामातून आम्ही उत्तर देणार आहोत असे सांगून, मी कधीही सुट्टी घेतली नाही. आता मी डबल ड्युटी करत आहे.अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्यांना घरी बसवले आहे.त्यांच्याकडे आता काहीच काम उरले नाही त्यामुळे ते आरोप करत आहेत अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.

यावेळी त्यांनी रत्नागिरीतील बारसू येथे होणा-या तेलशुद्धीकरण प्रकल्पावरही भाष्य केले.स्थानिक नागरिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प केला जाणार नाही. रेटून आणि अन्याय करू हा प्रकल्प केला लादला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट करत, केवळ त्यांचे मुख्यमंत्री पद गेल्याने या प्रकल्पाला विरोध करायचा म्हणून हे सर्व चालले आहे, असा हल्लाबोलही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. हा हरीत तेलशुद्धीकरण प्रकल्प असल्याने या प्रकल्पातून कसलेही प्रदूषण होणार नाही याची हमी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते.त्यामुळे पंतप्रधानांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला याचीही आठवण मुख्यमंत्र्यांनी करून देत ठाकरे यांनी त्यावेळी याला विरोध केला नाही असेही स्पष्ट केसे. त्यावेळी विशिष्ट तडजोडी झाल्या होत्या आता मुख्यमंत्री पद गेल्यानंतर विरोध करण्याचे कारण काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. समृद्धी महामार्गाला सुद्धा सुरुवातीला विरोध करण्यात आला होता. मात्र आम्ही तो जिद्दीने पुढे नेला.चांगल्या कामाला विरोध करणे हा दुटप्पीपणा आहे अशी टीकाही त्यांनी ठाकरे यांच्यावर केली.

दौऱ्यावर असूनही मुख्यमंत्र्यांनी केला ६५ फाईल्सचा निपटारा

मुख्यमंत्र्यांच्या सातारा दौ-यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून मुख्यमंत्री शिंदे यांनी दरे येथून केलेल्या कामांची माहिती दिली.सातारा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री सचिवालयातील ६५ फाईल्सचा निपटारा केला असल्याचे स्पष्ट केले.मुख्यमंत्री सचिवालयात विविध विभागांच्या फाईल्स येत असतात. त्या प्रलंबित राहू नयेत म्हणून नियमित निपटारा करण्यात येतो. मुख्यमंत्री सध्या सातारा दौऱ्यावर असून सचिवालयातील फाईल्स थांबून राहू नयेत म्हणून त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विभागांच्या ६५ फाईल्सचा निपटारा केला तसेच सूचना ही दिल्या.सध्या अवकाळी पावसाचे वातावरण असून मुख्यमंत्र्यांनी त्याही अनुषंगाने मदत व पुनर्वसन विभागाला तयारीत राहण्याबाबत निर्देश दिले असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आले.

Previous articleमंत्री संजय राठोड यांचे पीएस,ओएसडी,अधिकारी मागतात मोठी रक्कम ! कोणी केला गंभीर आरोप ?
Next articleमंत्री उदय सामंतांच्या भेटीनंतर शरद पवारांनी बारसू प्रकल्पाबाबत घेतली महत्वाची भूमिका