मंत्री उदय सामंतांच्या भेटीनंतर शरद पवारांनी बारसू प्रकल्पाबाबत घेतली महत्वाची भूमिका

मुंबई नगरी टीम

मुंबई । रत्नागिरीतील बारसू येथे होणा-या तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे.या मुद्द्यारून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला असतानाच राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सांमत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेवून या प्रकल्पासंदर्भीत माहिती देवून चर्चा केली. एखादा महत्त्वाचा प्रकल्प राज्यात होत असताना त्यात स्थानिकांना विश्वासात घेतले पाहिजे.त्याला विरोध असेल तर त्यातून मार्ग काढण्याचा सरकारने प्रयत्न करावा. कोकणात नवीन प्रकल्प होत असेल आणि त्यावर स्थानिकांच्या तीव्र भावना असतील तर कोणत्याही सरकारने त्याची नोंद घेतली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रत्नागिरीतील बारसू येथे होत असलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत भूमिका मांडली.बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या स्थानिकांवर बळाचा वापर करण्यात आला.या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज शरद पवार यांची भेट घेवून बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत चर्चा केली.यावेळी उदय सामंत यांनी बारसू येथील स्थानिक ग्रामस्थ आणि शासकीय अधिकाऱ्यांची उद्या गुरुवारी बैठक आयोजित करून त्यातून काय निष्पन्न होते याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली. इतर काही प्रश्न असतील तर त्यावरही मार्ग काढण्यासाठी चर्चा करण्याची तयारी उदय सामंत यांनी दाखवल्याचे शरद पवार यांनी सांगितले.या बैठकीत काही मार्ग निघाल्यास आनंद आहे.जर नाही निघाला तर त्यावर मार्ग काढण्यासंबंधात चर्चा करता येईल असेही शरद पवार यावेळी म्हणाले.एखादा प्रकल्प करत असताना स्थानिक लोकांना विश्वासात घ्या. त्यांचा विरोध आहे तर तो का आहे हे समजून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा अशा सूचनाही त्यांनी केल्या.

महाराष्ट्रातील उद्योग अन्य राज्यात चालले आहेत. सरकार काही करत नाही ही भूमिका आम्ही मांडत आहोत.त्यामुळे कोकणातसुध्दा उद्योग वाढावेत अशा प्रकारचे मत मांडणारा एक वर्ग आहे. त्यांच्याकडून कोकणाकडे दुर्लक्ष होत आहे अशी सरकारकडे तक्रार होती.अशावेळी काही प्रकल्प आले आणि त्यावेळी प्रकल्पासंदर्भात विरोध असेल तर तो समजून घेणे, त्यांचा गैरसमज दूर करणे, किंवा जर होत नसेल आणि तेथील एकंदरीतच स्थितीला नुकसान करत असेल तर अन्य जागा निवडावी या पर्यायांची चर्चा करावी लागते आणि ती केली पाहिजे असे मत शरद पवार यांनी मांडले.खारघर प्रकरणी एक सदस्य समितीचा उपयोग होणार नाही. एक सदस्य हा सरकारचा अधिकारी आहे. त्याने निर्णय घेतले तर त्यात राज्याच्या प्रमुखापासून अन्य सहकारी आहेत. त्यात राज्याच्या प्रमुखांचाही सहभाग आहे. अशी तक्रार असेल तर त्याची चौकशी एक अधिकारी करु शकत नाही. म्हणून या प्रकरणाची चौकशी करायला न्यायाधीशांची समिती स्थापन करून पावले टाकावीत अशी मागणी अगोदरच केली आहे असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Previous articleमी सुट्टीवर नाही तर डबल ड्युटीवर ; अडीच वर्ष घरी बसलेल्यांनी मला सांगू नये !
Next article‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार