आणि ……… मुख्यमंत्र्यांनी मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला
मुंबई नगरी टीम
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या काही भागात उद्भवलेल्या पूर परिस्थितीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाजनादेश यात्रेतूनही क्षणोक्षणी बारकाईने लक्ष तर होतेच पण अधिक गतीने मदत होण्यात कुठलीच कसूर राहू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी रात्रीतच मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या सहा दिवसांपासून विदर्भातील सर्वच भागांमध्ये महाजनादेश यात्रेत गावोगावचे अभिवादन स्वीकारल्यानंतर मधल्या प्रवासात राज्य कारभाराचा गाडा मुख्यमंत्र्यांच्या रथातून चालतो आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला विदर्भात अफाट प्रतिसाद मिळाला. मार्गावरच्या प्रत्येक गावात हजारो लोक मुख्यमंत्र्यांच्या आगमनाची वाट पाहत असतात. यात्रा थांबणार असे पूर्वनियोजन नसतानाही लोकांची गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांना आपला रथ थांबवून लोकांचे स्वागत स्वीकारावे लागते. जनतेला अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री मार्गस्थ होतात. मात्र दोन गावांच्या अंतरात जो काही प्रवास होतो, त्या प्रवासात मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण लक्ष राज्यकारभारावर केंद्रित असते. गेल्या दोन दिवसात राज्यात पूर परिस्थिती उद्भवली तेव्हापासून मुख्यमंत्री पूरग्रस्त जिल्ह्यांच्या संपर्कात आहेत. लष्कर, नौदल, वायुसेना, मुख्य सचिव, जिल्हा प्रशासन अशा सर्व आघाड्यांवर आढावा घेणे आणि तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्याचा मुख्यमंत्र्यांचा नित्यक्रम सुरू आहे. गेल्या दोन दिवसात उद्भवलेल्या पूरपरिस्थिती बाबत काहीच कमतरता राहणार नाही याची संपूर्ण काळजी यात्रेच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. मात्र, राज्यातील मोठ्या भागात नैसर्गिक आपत्ती उद्भवली असताना आपल्या यात्रेच्या वेळापत्रकात थोडा बदल करून मुख्यमंत्र्यांनी मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला.
अकोला येथील पूर्वनियोजित सभा संपल्यावर मुख्यमंत्री मुंबईला रवाना होणार आहेत. उद्या सकाळी महत्वपूर्ण विभागांच्या बैठकी घेऊन, आवश्यक त्या सर्व कारवाईच्या सूचना देऊन मुख्यमंत्री पुन्हा आपल्या महाजनादेश यात्रेत सामील होणार आहेत. प्रत्यक्षात रथातूनच त्यांनी उपाययोजनांचे सर्व आदेश दिल्यावरही संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला.