सेल्फी काढत “पुर पर्यटन” करणा-या मंत्र्यांना लाज कशी वाटत नाही

सेल्फी काढत “पुर पर्यटन” करणा-या मंत्र्यांना लाज कशी वाटत नाही

मुंबई नगरी टीम

परळी : राज्यातील अनेक जिल्ह्यांवर पुराचे महासंकट आले आहे. अशा वेळी संवेदनशील राहुन जनतेला मदत करण्याऐवजी सत्ताधा-यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. मदतीच्या नावाखाली सेल्फी, व्हिडीओ काढत पुर पर्यटन करणा-या मंत्र्यांना लाज कशी वाटत नाही? अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपला संताप व्यक्त केला असून, मुख्यमंत्री महोदय, संकटाच्या प्रसंगात असंवेदनशीलतेचे प्रदर्शन करून जनतेच्या दुःखावर मीठ चोळणा-या जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची हकालपट्टी करा, अशी मागणी  मुंडे यांनी केली.

कोल्हापूर भागात मदतीसाठी गेलेल्या जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचा पुर पर्यटनाचा सेल्फी आणि व्हिडीओ काढत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रचंड संताप निर्माण झाला असून, धनंजय मुंडे यांनीही सत्ताधा-यांच्या या असंवेदनशीलतेवर तिव्र शब्दात कोरडे ओढले आहेत. पलुस दुर्घटनेतील एका-एका मृतदेहाचे चित्र आठवले तरी मनाला चटका लागुन डोळ्यात चटकन पाणी येते, अशावेळी मंत्री आणि अधिकार्‍यांना सेल्फीसाठी चेहर्‍यावर हसु आणि पोज कशी देता येते? तुम्हाला काही संवेदना उरल्या आहेत का नाही? असा सवाल उपस्थित करीत या असंवेदनशील मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, संबंधित अधिका-यांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांवर पुराचे महासंकट आले आहे. मागील ७० वर्षात राज्यावर अनेक संकटे आली, मात्र सरकारची अनास्था ७० वर्षात इतकी कधीच दिसली नाही. आपत्कालीन कक्ष कोठे आहेत? माहित नाही. नियंत्रण कक्ष कोठे आहेत ? माहित नाही. लोकांना वाचवण्यासाठी बोटी नाहीत, जनतेला रेशन मिळत नाही, ४-४ दिवसांपासून लोक घरांच्या छतावर बसून आहेत.  संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही. ही वेळ राजकारण करण्याची नसली तरी, पुर पर्यटन करणार्‍या, अशा गंभीर परिस्थितीत पक्षाच्या बैठका घेणा-या, आनंदोत्सव करत नाचणार्‍या मंत्र्यांची पुजा करायची का ? गंभीर परिस्थितीत ही सरकार महंम्मद तुघलकी निर्णय घेत आहे. सरकारने काढलेल्या एका शासन आदेशात अतिवृष्टी व पुरामुळे २ दिवसांपेक्षा अधिक कालावधी करीता क्षेत्र पाण्यात बुडाले असल्यास त्यामुळे निराधार होणार्‍या कुटुंबांना प्रति कुटुंब १० किलो गहु व तांदुळ देण्याचा निर्णय काढला आहे. लोकांनी २ दिवस स्वत: ला मदतीसाठी पाण्यात बुडवून घ्यायचे का ? असे सवाल मुंडे यांनी केले आहेत.

Previous articleआतापर्यंत अडीच लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
Next articleखूशखबर : १ हजार ५६० शिक्षकीय पदे भरणार