भीक नव्हे तर जनतेने जिव्हाळ्याने केलेली मदत

भीक नव्हे तर जनतेने जिव्हाळ्याने केलेली मदत

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोल्हापूर सांगली साता-यातील पुरग्रसंतांसाठी बोरीवलीत काढलेल्या मदत फेरीवरून राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मंत्री विनोद तावडे आणि सरकारवर हल्ला चढवल्यानंतर त्याला मंत्री विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे मग ती रक्कम खासदार संभाजी राजे यांना भीक का वाटावी, असा प्रश्न मला पडला आहे अशा शब्दात तावडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आपल्या फेसबुक अकाऊंटवरून मंत्री विनोद तावडे यांचा मदत फेरीचा व्हिडीओ शेअर करत, छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला लक्ष्य केले होते. कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या महापुरात तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले, कित्येकांचे संसार पाण्याखाली गेले. मात्र, सरकारने हवी तेवढी मदत न दिल्याचा आरोप सर्वच स्तरातून होत आहे. त्याच पार्श्वभूमीर संभाजीराजेंनी विनोद तावडेंच्या मदत फेरीवरूनसरकारला लक्ष्य केले होते.

संभाजीराजे यांच्या टिकेला प्रत्युत्तर तावजे यांनी एका निवेदनाद्वारे दिले आहे.बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिक यांनी आपापल्या कुवतीनुसार १० रुपये, ५० रुपये, १०० रुपये देऊन जमा केलेला निधी म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजी राजे यांना भीक का वाटावी, असा प्रश्न मला पडला आहे. या आपत्तीच्या वेळी कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील आपल्या बंधू भगिनींना मदत करण्याची सर्वसाधारण माणसाला इच्छा होती आणि त्यासाठी मंत्री असूनही मतदारसंघात फिरून यासर्वांचं प्रेम, त्यांनी देऊ केलेली मदत एकत्र करून पूरग्रस्तांसाठी पाठविली, तर याला भीक का म्हणावे, हा प्रश्न ही मदत देणा-या प्रत्येक माणसाला पडला आहे आणि म्हणूनच पूरग्रस्तांसाठी मदत पाठविलेल्या जनतेच्या भावनांचा अनादर होत आहे, असे मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे.

गोर गरीब रिक्षावाले, फेरीवाले, छोटे-छोटे दुकानदार, हातावर पोट असणार्‍या माझ्या गरीब जनतेकडून जमा झालेले १०-१० रुपये मिळून ३.५० लाख रुपये आणि इतर मोठ्या देणगीदारांकडून एकत्र झालेले २४.५० लाख रुपये, अशी एकूण २८ लाखांची रक्कम फक्त बोरिवलीकरांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आली. हा आमचा खारीचा वाटा आहे, हे आम्हां सर्वांना माहीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या या मदतफेरीचे राजकीय द्वेषापोटी विडंबन केले, हे राजकारण म्हणून मी समजू शकतो. कारण, त्यांच्याकडे आता बाकी कोणतेही मुद्दे राहिले नाहीत आणि एका विधानसभेतून पहिल्यांदाच इतका मोठ्या प्रमाणात मदतनिधी जमा होतो, हे त्यांना पहावले नसेल. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या राजकीय प्रचाराला संभाजी राजे यांनी बळी पडावे, याचे मला दुःख आहे असेही तावडे यांनी म्हटले आहे.

आमच्यासारख्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अडचणीत असलेल्या जनतेला आधार दिला,गोरगरिबांचे प्रेम जमा करून पूरग्रस्तांसाठी पाठविले,याचे संभाजी राजे यांनी खरेतर कौतुक करायला हवे होते. पण त्याची राजे यांनी अवहेलना केली, याची मला खंत वाटते असेही आपल्या निवेदनात तावडे यांनी म्हटले आहे.

Previous article२२ मंत्र्यांचे ९० हजार कोटीचे भ्रष्टाचार सिद्ध करण्यास तयार
Next articleमुंबईतील वाहतूक कोंडीवर आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचा उतारा