अभिनेते शाहरुख खान यांच्या हस्ते वांद्रे स्टेशनच्या पोस्ट पाकिटाचे अनावरण
मुंबई नगरी टीम
मुंबई : युनेस्कोने जागतिक हेरिटेज म्हणून दर्जा दिलेल्या जुन्या कौलारू छपराच्या टुमदार वांद्रे रेल्वे स्टेशनच्या सन्मानार्थ शालेय शिक्षण मंत्री आणि स्थानिक आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या पोस्ट पाकीटचे अनावरण आज सिने अभिनेते शाहरुख खान यांच्या हस्ते वांद्रे रेल्वे स्टेशन वर छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आले.
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातील अनेक संस्था व त्यांच्या वास्तू या ऐतिहासिक परंपरा असलेल्या आहेत. गेली अनेक वर्षे सातत्याने त्या लोकसेवेचे काम करत आहेत किंवा त्या या मतदार संघातील लँण्ड मार्क ठरल्या आहेत. त्यांच्या कार्याने त्या मोठ्या व प्रसिद्ध ही आहेत. मात्र शासकीय पातळीवर त्यांचे एक शासकीय दस्ताएवज म्हणून दखल घेतली जावी यासाठी स्थानिक आमदार या नात्याने शालेय शिक्षण मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी अशा वास्तू व संस्थांचे पोस्ट पाकीट तयार करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्टाला महसूल मिळावा म्हणून ही माय स्टँप, माय पाँकेट योजना जाहीर केली असून त्या योजनेतून हे पाकीट तयार करण्यात आले आहे.
या मालिकेतील सुमारे १७ पोस्ट पाकिटे तयार करण्यात येणार असून रामकृष्ण मठ व मिशन, आर्य समाज, श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, अशा संस्थांचे पोस्ट पाकिटे समारंभ पूर्वक प्रकाशित करण्यात येत असून याच मालिकेतील वांद्रे स्टेशनच्या पोस्ट पाकिटाचे अनावरण आज सिने अभिनेते शाहरुख खान, शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅड. आशिष शेलार, पोस्ट मास्तर जनरल एच.सी. अग्रवाल, पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक अनिल कुमार गुप्ता, नगरसेविका अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला,आदि. उपस्थित होते. यावेळी शाहरुख खान यांनी मंत्री आशिष शेलार यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले तसेच पोस्टाच्या पत्रात प्रेम, रोमान्स, मोहब्बत असते. पोस्टाची यंत्रणा गावागावात पोहचली आहे तीचा जास्तीत जास्त लोकांनी वापर करा, असे आवाहन त्यांनी केले.