एसटी कर्मचा-यांना खुशखबर : पगार ३१ ऑगस्ट पर्यंत होणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : एसटीतील कर्मचारी बांधवांना गणपती उत्सव मोठया उत्साहात साजरा करता यावा, यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन ३१ ऑगस्ट पर्यंत अदा करण्यात यावे, असे आदेश परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दर माह ७ तारखेला होते. पण यंदा गणपती उत्सव २ सप्टेंबर ला असल्याने सणाच्या पूर्व तयारीसाठी कर्मचाऱ्यांच्या हातात त्यांच्या हक्काचे वेतन योग्य वेळी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष बाब म्हणून एक आठवडा अगोदर कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
एसटीमध्ये सुमारे १ लाख कर्मचारी आहेत. या सर्वांचा पगार दर महिन्याला ७ तारखेला होतो. सण व उत्सवाच्याक्षणी त्यांना कपडे खरेदी व इतर खर्चासाठी पैशाची अत्यंत निकड असते. अशावेळी सण उत्सवाच्या अगोदर त्यांना वेतन मिळाल्यास त्यांचा उत्सवाचा आनंद व्दिगुणित होऊ शकतो.ही भावना लक्षात घेऊन मंत्री दिवाकर रावते यांनी सदरचे आदेश दिले आहेत. मंत्री दिवाकर रावते यांचे आदेशामुळे यापूर्वी देखील दिवाळी-ईद उत्सवापूर्वी संबंधित सणासुदीला कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित तारखेच्या अगोदर देण्यात आला आहे.