कडकनाथ फसवणूक प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी
मुंबई नगरी टीम
सांगली : कडकनाथ घोटाळ्या प्रकरणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची काहींकडून नाहक बदनामी सुरू आहे. अगदी खालच्या पातळीवर जावून आरोप सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहींकडून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. सदाभाऊ गप्प का असा आरोप केला जात होता, पण सदाभाऊंनीच कडकनाथ प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
महारयत अॅग्रो कंपनी मार्फत काही वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील शेतकरी कुक्कुट पालनाचा व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायामध्ये शेतकरी वर्गाची फसवणूक झाली आहे. अशा बातम्या समाजमाध्यमातून व वर्तमानपत्रांच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या प्रकरणाची योग्य त्या तपास यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी विनंती केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणाची तात्काळ सीआयडी चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावे असे आदेश दिले आहेत.