भास्कर जाधव तब्बल १५ वर्षानंतर “स्वगृही”

भास्कर जाधव तब्बल १५ वर्षानंतर “स्वगृही”

मुंबई नगरी टीम

मुंबई :  गुहागरचे राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी आज आमदारकीचा राजीनामा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. २००४ ला शिवसेनेने भास्कर जाधव यांना उमेदवारी नाकारल्यानंतर तब्बल १५ वर्षानंतर त्यांनी मातोश्रीची पायरी चढली. त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

गुहागरचे राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी आज सकाळी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे औरंगाबादमध्ये असल्याकारणाने जाधव यांच्यासह शिवसेना नेते अनिल परब, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी चार्टड विमानाने औरंगाबाद गाठले. त्यानंतर भास्कर जाधव यांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी अध्यक्ष हरिभाऊ बागडे चक्क मोटार सायकल वरून कार्यालयात पोहचले. जाधव यांचा राजीमाना स्वीकारताच जाधव यांच्यासह सर्व नेते मंडळी विमानाने पुन्हा मुंबईत पोहचल्यानंतर जाधव यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार संजय राऊत, म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत, सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिवसैनिकांना तुमचे कौतुक होते. शिवसैनिक लढवैया होता आणि आहे. तुमचे पुन्हा शिवसेनेत स्वागत करतोय अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझे कोणाशीही वाद नव्हते, किंवा कोणावरही आरोपही नाहीत. मी मूळचा शिवसैनिक आहे. पूर्वी जे झाले ते झाले. माझा मूळ स्वभाव मला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे मी माझ्या पूर्वाश्रमीच्या घरात दाखल झालो आहे असे भास्कर जाधव यांनी सांगितले. २००४ च्या निवडणुकीत चिपळूण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागण्यासाठी आलेल्या भास्कर जाधव यांना त्यावेळी उमेदवारी नाकारण्यात आली होती. उमेदवारी नाकारल्यानंतरही भास्कर जाधव यांनी अपक्ष म्हणून ती निवडणूक लढवली.शिवसेनेने प्रभाकर शिंदे यांना उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रमेश कदम उमेदवार होते. त्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे रमेश कदम निवडून आले आणि भास्कर जाधव यांचा पराभव झाला. जाधव यांनी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे विधान परिषदेवर त्यांचे राजकीय पुनर्वसन केले.नंतर जाधव गुहागर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्यमंत्री झाले. त्यामुळे पुन्हा पक्षप्रवेशाच्या निमित्ताने जाधव यांनी तब्बल १५ वर्षानंतर मातोश्रीची पायरी चढली आहे.

सत्तेची चटक लागल्यानेच भास्कर जाधव शिवसेनेत गेले आहेत परंतु त्यांचा येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार पराभव करून याचा बदला घेईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी यांनी दिला आहे.गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला त्यावर प्रतिक्रिया देताना मलिक यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.भास्कर जाधव हे सत्तेशिवाय राहू शकत नाही. ते शिवसेनेत असताना त्यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवारानेच पराभव केला होता. पराभव झाल्यावर ते राष्ट्रवादीत आले. त्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर पाठविण्यात आले. विधानसभेचे उमेदवारी देण्यात आली.त्यांना मंत्री करण्यात आले. परंतु आता ते सत्तेसाठी शिवसेनेत गेले आहेत असेही मलिक म्हणाले.येत्या निवडणुकीत त्यांच्यासमोर दमदार उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस देईल आणि त्यांचा पराभव करेल असा इशारा मलिक यांनी दिला.

Previous articleकेंद्राचा जाचक वाहतूक कायदा तूर्तास राज्यात लागू होणार नाही
Next articleराज्य सरकारला पाकिस्तानी शेतक-यांबद्दल प्रेम का उफाळून आले आहे ?