निवडणुकीच्या तोंडावर ऊसतोड कामगारांची केलेली दिशाभूल व गाजर

निवडणुकीच्या तोंडावर ऊसतोड कामगारांची केलेली दिशाभूल व गाजर

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यास काही तासांचा कालावधी राहिला असताना ऊसतोड कामगारांसाठी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाने जाहीर केलेले महामंडळ म्हणजे निवडणुकांसाठी ऊसतोड कामगारांना आणखी एक असून गाजर आहे. हा त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ असावे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी सातत्याने लावून धरली होती. १२ डिसेंबर २०१४ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या समाधीस्थळी परळी येथे  मुंडे साहेबांच्या नावाने ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करून त्याचे कार्यालय परळी येथे करण्याची घोषणा केली होती मात्र पाच वर्षात ही हे महामंडळ अस्तित्वात येऊ शकले नाही.

विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेर  धनंजय मुंडे यांनी या महामंडळासाठी सातत्याने पाठपुरावा केला मात्र पाच वर्षे महामंडळ न करता एका योजनेलाच महामंडळ केल्याचे भासवून ते ही सरकारने गुंडाळले.  तसेच परळी येथे केवळ दाखवण्यासाठी एका बंद कामगार कल्याण केंद्रामध्ये कार्यालयाचा बोर्ड लावला आहे.हा विषय धनंजय मुंडे यांनी सातत्याने लावून धरला होता.  अखेर पाच वर्षानंतर राज्य सरकारला जाग आली असून आज आचारसंहिता लागण्यास केवळ एक ते दोन दिवस बाकी असताना घाईगडबडीने गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार महामंडळ जाहीर केल्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . मात्र या महामंडळाला कुठलेही अधिकार,  महामंडळाचे नियम , कार्यक्षेत्र याबाबत कोणतीही बाब ठरवण्यात आली नसून अशा प्रकारे महामंडळ ठरवण्याचा हा एक देशातला नवीनच विक्रम असेल अशी खोचक प्रतिक्रिया ही मुंडे यांनी दिली.

Previous articleऊर्जा विभागातील अनुकंपा तत्वावरील इच्छुकांसाठी मोठा निर्णय
Next articleमहाजनादेश यात्रेच्या प्रचारार्थ डिजिटल चित्ररथ सज्ज