भाजपा महायुतीचा विजय निश्चित
मुंबई नगरी टीम
मुंबई : भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असून निवडणुकीत महायुती किमान २२० जागा जिंकून विजयी होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला राज्यात मिळालेला प्रचंड प्रतिसाद ध्यानात घेता महायुतीला २२० पेक्षाही जास्त जागा मिळू शकतात, असा ठाम विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी मुंबईत व्यक्त केला.
राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपा प्रदेश कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा निवडणूक लढणार आहे. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारने केलेले काम आम्ही जनतेसमोर मांडू. गेल्या पाच वर्षांत विविध निवडणुकांमध्ये भाजपाला सातत्याने यश मिळालेले आहे. भाजपा महायुती सरकारचे काम आणि गेल्या पाच वर्षांतील संघटनात्मक तयारी यामुळे आगामी निवडणुकीत नक्की यश मिळेल.
भाजपा शिवेसना युतीविषयी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान चर्चा चालू आहे. युतीची घोषणा लवकरच होईल, अशी माहिती त्यांनी दिली.