निकालानंतर राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या आघाडीचे सरकार

निकालानंतर राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या आघाडीचे सरकार

मुंबई नगरी टीम

संगमनेर : निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी निवडणुकासाठी सज्ज आहे. गेल्या पाच वर्षाच्या भाजप शिवसेना सरकारच्या काळात प्रगत महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांच्या विरोधात राज्यातील जनतेच्या मनात प्रचंड असंतोष असल्याने या निवडणुकीत राज्यात परिवर्तन होऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असा ठाम विश्वास  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

संगमनेर येथे बोलतान थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी सज्ज असून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे जागावाटप जवळजवळ पूर्ण झाले आहे. भाजप शिवसेना सरकारच्या गेल्या पाच वर्षाच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. या सरकारच्या काळात राज्याच्या इतिहासात सर्वात जास्त म्हणजेच १७ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. मोठा गाजावाजा केलेली कर्जमाफी योजना फसलेली आहे. ८९ लाखांपैकी ५० टक्के शेतक-यांनाही कर्जमाफी मिळालेली नाही.  शेतक-यांच्या मालाला हमीभाव नाही. पीक विमा मिळत नाही. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आर्थिक मंदीमुळे उद्योग क्षेत्र अडचणीत आले आहे. राज्यातील दुष्काळ आणि पूर हाताळणीत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारकडे आर्थिक नियोजन नसल्याने राज्यावरील कर्जाच्या बोज्यात गेल्या पाच वर्षात दुप्पट वाढ झाली आहे. हे मुद्दे आघाडी जनतेपर्यंत पोहोचवणार असून जनतेला भेडसावणा-या या ज्वलंत प्रश्नांवरच आम्ही निवडणूक लढवणार आहोत. राज्यातील जनता या निवडणुकीत मस्तवाल भाजप शिवसेनेचा पराभव करून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला विजय करेल व निवडणूक निकालानंतर राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

Previous articleभाजपा महायुतीचा विजय निश्चित
Next articleनारायण राणेंना पक्षात घेण्याचा प्रश्नच येत नाही…..