तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल

तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी पुणे जिल्हा पुरुष आणि महिला मतदार संख्येत आघाडीवर आहे तर तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल स्थानी आहे.

राज्यात ३१ ऑगस्ट पर्यंत ४ कोटी ६७ लाख ३७ हजार ८४१ पुरुष मतदार, ४ कोटी २७ लाख ५ हजार ७७७ महिला तर २ हजार ५९३ तृतीयपंथी अशा एकूण ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदारांची नोंदणी झाली आहे.पुणे जिल्ह्यात एकूण ४० लाख १९ हजार ६६४ पुरुष मतदार तर ३६ लाख ६६ हजार ७४४ महिला मतदार  आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ३९ लाख २९ हजार २३२ पुरुष मतदार तर ३२ लाख ९७ हजार ६७ महिला मतदार आहेत. ठाणे जिल्ह्यात एकूण ३४ लाख ४ हजार १४८ पुरुष मतदार आणि २८ लाख ८१ हजार ७७७ महिला मतदार आहेत.

तृतीयपंथी वर्गवारीमध्ये मुंबई उपनगर जिल्हयात एकूण ५२७ तृतीयपंथी मतदार,  ठाणे जिल्ह्यात ४६० आणि पुणे जिल्ह्यात २२८ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे.२००९ आणि २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी २८८ मतदारसंघांपैकी चिंचवड मतदारसंघात अनुक्रमे ३ लाख ९१ हजार ८५७ आणि ४ लाख ८४ हजार ३६२ मतदारांची नोंदणी झाली होती.२००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड नंतर दुसऱ्या क्रमांकावर चांदिवली मतदारसंघात ३ लाख ६८ हजार २३३ मतदारांची नोंद होती. तर वडगाव (शेरी) या मतदारसंघात एकूण ३ लाख ६५ हजार ८६१ मतदारांची नोंद करण्यात आली. हडपसर या मतदारसंघात ३ लाख ६३ हजार ७ मतदार तर खडकवासला या मतदारसंघात ३ लाख ५६ हजार १३७ मतदारांची नोंद होती.

२०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत चिंचवडनंतर खडकवासला मतदारसंघात ४ लाख २८ हजार २३९ मतदारांची नोंद होती. तर पनवेल या मतदारसंघात एकूण ४ लाख २३ हजार ७१६ मतदारांची नोंद करण्यात आली. चांदिवली या मतदारसंघात ४ लाख १७ हजार ७०० मतदार तर हडपसर या मतदारसंघात ४ लाख १६ हजार ८०० मतदारांची नोंद होती. विशेष म्हणजे       चिंचवड, खडकवासला, चांदिवली आणि हडपसर या चार मतदारसंघात २००९ आणि २०१४ साली अधिक मतदार संख्या असल्याची नोंद आहे.२००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत तिरोडा मतदारसंघात १ लाख ९१ हजार १४९ मतदारांची नोंद होती. तर २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत वडाळा मतदारसंघात १ लाख ९६ हजार ९५१ मतदारांची नोंद होती.

Previous articleदोन्ही कॉग्रेसचा संयुक्त जाहिरनामा प्रसिद्ध करणार 
Next articleवंचित बहुजन आघाडीची २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर