२८८ जागांसाठी ३ हजार २३९ उमेदवार रिंगणात
मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात २८८ मतदारसंघात १ हजार ५०४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असून, एकूण ३ हजार २३९ उमेदवार निवडणूक रिेंगणात आहेत. सर्वात जास्त २४६ उमेदवार पुणे जिल्ह्यातून तर सर्वात कमी २३ उमेदवार सिंधुदूर्ग जिल्ह्यातून निवडणूक लढवणार आहेत.
शनिवारी झालेल्या छाननीअंती ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातून १ हजार ५०४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदारसंघात २६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात ३८ उमेदवार, जळगाव जिल्ह्यात १२ मतदारसंघात १०० उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात ५९ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात ६८ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४४ उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात १०९ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात ४७ उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १४६ उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४२ उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात ४ मतदारसंघात ४७ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ३८ उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ७१ उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात ८८ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात १३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ३४ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ५३ उमेदवार, जालना जिल्ह्यात ५ मतदारसंघात ७९ उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात १२८ उमेदवार, नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात १४८ उमेदवार, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ५३ उमेदवार, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात २१४ उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ मतदारसंघात २४४ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात ८९ उमेदवार, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ७८ उमेदवार, पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात २४६ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात ११६ उमेदवार, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात ११५ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ७९, उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात ५० उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात १५४ उमेदवार, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात ७३ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात ३२ उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात २३ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात १०६ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात ६८ उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत.
सर्वात कमी ३ उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदार संघात तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नांदेड दक्षिण, बीड, औरंगाबाद पूर्व, जालना या चार मतदारसंघात ३१ पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने एका ईव्हीएमसाठी ३ बॅलेट युनिटची (बीयु) आवश्यकता राहणार असून कंट्रोल युनिट (सीयु) एकच लागणार आहे. अकोट, रिसोड, धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती, नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, साकोली, गोंदिया, गडचिरोली, वणी, नांदेड उत्तर, वैजापूर, नाशिक पश्चिम, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, उल्हासनगर, बेलापूर, पिंपरी, पुणे कॅन्टोन्मेंट, नेवासा, गेवराई, माजलगाव, परळी, लातूर शहर, तुळजापूर, सोलापूर शहर मध्य, पंढरपूर, सांगोला, हातकणंगले अशा ३० मतदारसंघांमध्ये १५ पेक्षा अधिक उमेदवार असल्याने दोन बॅलेट युनिट लागणार आहेत. राज्यात ईव्हीएमच्या अत्युच्च उमेदवारसंख्येच्या मर्यादेपेक्षा कमी उमेदवारांची संख्या असल्याने कुठेही मतपत्रिकेवर (बॅलेटपेपर) मतदान घ्यावे लागणार नाही.नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदार संघात सर्वाधिक ९१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यामधून अर्जमाघारीनंतर केवळ ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात १२ कोटी ३९ लाख रुपयांची रोकड, १३ कोटी ४७ लाख रुपयांची दारु, १५ कोटी २९ लाख रुपये किमतीचे मादक पदार्थ आणि ८ कोटी ८७ लाख रुपये किमतीचे सोने, चांदी व अन्य मौलवान दागिणे असा सुमारे ४८ कोटी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.