मागाठाणेत शिवसेनेपुढे मनसेचे तगडे आव्हान
मुंबई नगरी टीम
मुंबई : युतीच्या जागा वाटपात मागाठाणे मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर या ठिकाणी प्रबळ विरोधक नसल्याने येथील निवडणूक एकतर्फी होणार असे चित्र होत मात्र प्रचाराच्या पहिल्याच आठवड्यात मनसेचे उमेदवार नयन कदम यांनी प्रचारात झंझावात निर्माण करीत शिवसेनेपुढे तगडे आव्हान उभे केल्याचे चित्र आहे.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या झालेल्या प्रचार सभेला मिळालेल्या प्रतिसादामुळे मनसेच्या आशा पल्लवीत झाल्याची चर्चा आहे.
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेने मागाठाणे मतदार संघात मनसेचा पराभव करून हा मतदार संघ काबीज केला.तेव्हा पासून या मतदार संघावर पुन्हा प्राबल्य मिळविण्यासाठी भाजपचे विधानपरिषद सदस्य प्रविण दरेकर यांनी मोठ्या प्रमाणत प्रयत्न केले. जागा वाटपात हा मतदार संघ भाजपला सोडला जाणार असल्याची चर्चा होती. त्याप्रमाणे भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी मोर्चे बांधणी केली असतानाच हा मतदार संघ शिवसनेच्या वाट्याला गेल्याने शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांना येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली.प्रचाराच्या सुरूवातीला शिवसेनेच्या झंझावातासमोर कोणताही पक्ष टिकणार नाही अशीच परिस्थिती होती.मात्र प्रचाराच्या पहिल्याच आठवड्यात मनसेने या मतदार संघात मुसंडी मारण्याचे प्रयत्न केल्याचे चित्र आहे.त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अशोकवन येथे झालेल्या प्रचार सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता मनसेने येथे मोठे आव्हान उभे केल्याचे स्पष्ट चित्र आहे.
राज ठाकरे यांच्या झालेल्या प्रचार सभेत मनसेचे उमेदवार नयन कदम यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. येथील शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात पक्षांतर्गतच मोठी नाराजी असल्याचे नयन कदम यांनी सांगून,सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन केले. विद्यमान आमदारांनी गेल्या पाच वर्षात विकासाची कोणतीच कामे केली नसल्याची टीकाही त्यांनी या सभेत करीत शिवसेनेचा आमदार शिवसैनिक नाही असे सांगत एकदा आम्हाला एकदा संधी द्या अशी भावनिक साद मतदारांना घातल्याने येथील मराठी मतदार कोणाला साथ देणार यावरच शिवसेना आणि मनसेच्या उमेदवाराचे भवितव्य ठरणार असल्याची चर्चा आहे.भाजपला हा मतदार सोडला नसल्याने येथील भाजपामध्ये मोठी नाराजी असून, या नाराजीचा फायदा मनसेला होईल असे मनसेच्या एका पदाधिका-याने सांगितले.सध्या या मतदार संघात असलेले चित्र या आठवड्यात होणा-या प्रचारावर अवलंबून आहे.शिवसेनेची संघटनात्मक बांधणी पाहता येथील गड सर करण्यासाठी मनसेला मोठी ताकद लावावी लागणार आहे.या मतदार संघात उत्तर भारतीय आणि मराठी मतदारांचे मोठे प्राबल्य असल्याने अंतिम टप्प्यात कोणाच्या पारड्यात मताचे दान जाईल यावरच येथील जय पराजयाचे चित्र अवलंबून आहे.