मला उद्धव ठाकरेंनी नव्हे तर एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकरांनी मंत्री केले

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मला उद्धव ठाकरे यांनी नाही तर एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी मंत्री केले अशा शब्दात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना ( उबाठा ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.एवढेच नाही तर मला म्हाडाचे अध्यक्षपद उद्धव ठाकरे यांच्यामुळे नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळाले होते,असा पलटवारही मंत्री सांमत यांनी केला.

शिवसेना ( उबाठा ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कोकण दौ-यात रत्नागिरी येथे झालेल्या सभेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला होता.शिवसेनेत आल्यावर उदय सामंत यांना मंत्रीपदाचा शब्द दिला होता.मंत्री पदाचा मी माझा शब्द पाळला.तसेच २०१४ मध्ये त्यांना म्हाडाचे अध्यक्ष केले मात्र ज्यांनी मला शब्द दिला तो शब्दाला कमी पडला, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सामंत यांच्यावर केली होती.उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या टीकेचा समाचार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतला.काँग्रेसच्या कुबड्यांवर उभे असलेल्यांनी अगोदर स्वत: च्या पायावर उभे रहावे असा हल्लाबोल करतानाच भाजपशी युती करून काँग्रेससोबत गेलेल्या लोकांना कोकणातील जनता त्यांची जागा दाखवेल असा टोलाही सामंत यांनी लगावला.उद्धव ठाकरे यांच्या कोकणातील सभांचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगतानाच उलट त्यांच्या सभेवेळी व्यासपीठावर असणारे काही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असतील असा दावाही यावेळी मंत्री सामंत यांनी केला.

उद्धव ठाकरे हे शिल्लक सेनेचे प्रमुख असून,मी मातोश्रीवर कधी जात नव्हतो तर मिलिंद नार्वेकर यांच्यामुळे मातोश्रीवर गेलो.सर्व पक्ष वेगळे लढले असतानाही मी रत्नागिरीतून मोठ्या मताधिक्याने विजयी झालो असे सांगतानाच महाविकास आघाडी असताना नाशिक मध्ये मंत्रीपदाचा निर्णय होत असताना माझे नाव कापण्याचा प्रयत्न केला गेला.मात्र त्यावेळी एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी माझ्या नावाचा आग्रह धरल्याने मला मंत्री करण्यात आले.मला उद्धव ठाकरे यांनी नव्हे तर शिंदे आणि नार्वेकर यांनी मंत्री केले असे सामंत यांनी स्पष्ट केले.२०१४ मध्ये मला म्हाडाचे अध्यक्ष केले ते उद्धव ठाकरे यांनी नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी केले असे सांगून याचे साक्षीदार चंद्रकांत पाटील आहेत असेही सांमत म्हणाले.आमच्या रक्तात लाचारी नाही तर बाळासाहेबांनी सांगूनही काँग्रेस सोबत जाणे ही लाचारी आहे, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.कोकण हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असून, उद्धव ठाकरे यांच्या सभेवेळी व्यासपीठावर असणा-यांची नार्को चाचणी केली तर शिंदे यांच्या सोबत कोण कोण आहेत हे स्पष्ट होईल, असे सांगतानाच लोकसभा निवडणुकीत कोकणातील तिन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा दावाही सांमत यांनी केला.

Previous articleमुख्यमंत्री वयोश्री योजना : ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा होणार
Next articleअजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष ; पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला