अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष ; पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिंदे-ठाकरे गटाच्या वादानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मधिल फुटीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे.त्यानुसार अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.पक्षांतर्गत निवडणूक झाल्या नसल्याचे निरीक्षण नोंदवत शरद पवार गटाने उद्या ( बुधवारपर्यंत ) पक्षाचे नाव आणि चिन्ह सूचवावे असेही स्पष्ट केले आहे.या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे शरद पवार गटाच्या नेत्यांनी सांगितले.

जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी राज्यातील महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली.शिवसेना फुटीवर निर्णय देताना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या बाजूने निर्णय देत पक्षनाव आणि पक्षचिन्ह हे शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला होता.शिवसेना फुटीनंतर आज निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी फुटीवर निर्णय दिला आहे.अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट करत राष्ट्रवादीचे पक्षचिन्ह आणि पक्षनाव अजित पवार गटाला देण्याचा निकाल दिला आहे. या निकालामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडल्याने हे प्रकरणही निवडणूक आयोगाकडे गेले होते.हे प्रकरण गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित होते.याप्रकरणी एकूण १० सुनावण्या घेण्यात आल्या.या प्रत्येक सुनावणीवेळी शरद पवार हे जातीने हजर होते.निवडणूक आयोगाला दोन्ही गटाकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती.

पक्षांतर्गत निवडणूक झाल्या नसल्याचे निरिक्षण नोंदवित अजित पवाराकंडील पक्ष हा खरा पक्ष आहे. पक्ष आणि चिन्ह अजित पवार गट वापरतील असे निर्देश आयोगाने दिले आहेत.दोन खासदारांनी अजित पवार गटाच्या बाजूने तर ५ आमदारांनी दोन्ही बाजूंनी पत्र दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे.शरद पवार गटाने उद्या ७ फेब्रुवारीपर्यंत ( बुधवार पर्यंत ) पक्षचिन्ह आणि पक्षनावासाठी तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.अजित पवारांसोबत महाराष्ट्रातील ४१ आमदार ,नागालँडमधील ७ आमदार,झारखंड मधिल १ आमदार,लोकसभेचे २ खासदार,विधानपरिषदेतील ५ आमदार तर राज्यसभेतील १ खासदार आहेत.शरद पवारांसोबत राज्यातील १५ आमदार,केरळमधील १ आमदार,लोकसभेतील ४ खासदार, राज्यसभेतील खासदार आणि विधानपरिषदेतील ४ आमदार आहेत.

Previous articleमला उद्धव ठाकरेंनी नव्हे तर एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकरांनी मंत्री केले
Next articleखूशखबर : सर्व शाळांमधिल इयत्ता ४ पर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतरच भरणार