फडणवीस सरकारमधिल आठ मंत्र्यांचा पराभव

फडणवीस सरकारमधिल आठ मंत्र्यांचा पराभव

मुंबई नगरी टीम

मुंबई : फडणवीस सरकारमधिल तब्बल आठ मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या परळी मतदारसंघातून राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी पराभूत केले आहे हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.तर कर्जत जामखेड मतदारसंघातून जलसंधारणमंत्री राम शिंदे यांचा पराभव झाला आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला आहे.

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात भाऊ आणि बहिणीच्या लढतीत राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी सभा घेतल्या. मतदानाच्या एक दिवस अगोदर घडलेल्या नाट्यामुळे या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते.अखेर धनंजय मुंडे यांनी परळीतून बाजी मारून भाजपला धोबीपछाड दिली आहे.बीड मधून फलोत्पादनमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला.पुरंदर मधून जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यांचा पराभव कॅांग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांनी केला.जालन्यातून दुग्धविकासमंत्री अर्जून खोतकर यांचा पराभव झाला आहे.विदर्भात भाजपला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे कृषीमंत्री अनिल बोंडे हे पराभूत झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांनी त्यांचा पराभव केला.साकोली मध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री परिणय फुके हे पराभूत झाले आहेत.

Previous articleभाजप शिवसेनेच्या सत्तेचा उन्माद जनतेला पसंद पडला नाही
Next articleमुंबईत युतीचा बोलबाला ! राष्ट्रवादीने खाते खोलले