धनंजय मुंडेंच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब!
मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानसभेची निवडणूक गाजवणारा परळी विधानसभेचा निकाल हा धनंजय मुंडे यांनी म्हटल्याप्रमाणे अगदी तंतोतंत लागला. त्याचबरोबर जिल्ह्यातून धनंजय मुंडे यांना स्वतःसह माजलगाव प्रकाश सोळंके, बीड संदीप क्षीरसागर व आष्टी बाळासाहेब आजबे यांनाही निवडून आणण्यात यश आले आहे. याशिवाय मुंडेंनी सभा घेतलेल्या बहुतांश जागी आघाडीचे उमेदवार विजयी झाले असल्याचे चित्र आहे.
पक्ष गळतीला थारा न देता शरद पवार यांनी युवा पिढीला संधी देत ही निवडणूक मोठ्या उमेदीने लढली. त्यांच्या खांद्याला खांदा देत त्यांचे राजकीय शिष्य समजले जाणारे धनंजय मुंडे हे स्वतःच्या मतदारसंघात माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध लढले, अगदी अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी खासदार उदयनराजे भोसले, शहनवाज हुसेन यांच्यासह भाजपची मोठी फौज विरोधात असूनही मोठ्या मताधिक्याने जिंकले. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारक म्हणून मुंडेंनी राज्यात जवळपास ४० सभा घेतल्या.
सुरुवातीपासून उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या बीड जिल्ह्यातील तीन महत्वाच्या जागा निवडून आणण्यात मुंडेंना यश आले. त्याचबरोबर कर्जत जामखेड मधून रोहित पवार, अकोले मधून किरण लहामटे, सिंदखेड राजा मधून डॉ. राजेंद्र शिंगणे, अहमदपूर मधून बाबासाहेब पाटील, उदगीर मधून संजय बनसोडे यांच्यासाठी मुंडेंनी केलेल्या विजयी ठरल्या. याशिवाय इतर ३८ सभांपैकीही काही अपवाद वगळता अन्य सर्व जागी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पक्षात झालेल्या गळतीवरून अनेकदा धनंजय मुंडे यांना सत्ता पक्षाकडून हिनवले गेले मात्र निवडणूक काळात साताऱ्यात शरद पवार व परळी तालुक्यात सिरसाळा येथे धनंजय मुंडे या गुरू शिष्यांनी एकाच वेळी भर पावसात गाजवलेल्या तुफानी सभांनी राज्यात वातावरण निर्माण केले.