शेतक-यांना दिलासा ! पंचनाम्यासाठी नुकसानीचे छायाचित्रे  पुरावा म्हणून ग्राह्य धरणार

शेतक-यांना दिलासा ! पंचनाम्यासाठी नुकसानीचे छायाचित्रे  पुरावा म्हणून ग्राह्य धरणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून, त्यांना जास्तीत जास्त दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत. क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा,पंचनाम्याला विलंब लागत असेल तर नुकसानीचे स्थानिक शेतकऱ्यांनी काढलेली छायाचित्रे सुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजना यांचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची उद्या (शनिवारी) बैठक बोलविण्यात आल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.यावेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री  फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून अत्यंत तपशीलवाररित्या पीक परिस्थितीची माहिती घेतली. नुकसानीचे स्थानिक शेतकऱ्यांनी काढलेली छायाचित्रे सुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मुख्यमंत्री म्हणाले, यावर्षी प्रचंड पाऊस झाला आहे. अरबी समुद्रातील सुपरसायक्लॉनसह चार वादळांचा फटका बसला, या पावसाची तीव्रता ऑक्टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात अधिक होती.  त्यामुळे प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी, प्रत्येक शेतकऱ्याची समस्या ऐकून घ्यावी. यासाठी दुष्काळाच्या काळात उभारली, तशी यंत्रणा उभारावी, व्हॉटसअ‍ॅप क्रमांक सुद्धा संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत. शासनाचे या स्थितीवर संपूर्णपणे लक्ष असून, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थितीचे अवलोकन करावे. ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिके यामुळे बाधित झाली आहेत. प्रभावित भागाचे तात्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेशही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी दिले.

व्हिडीओ कॅान्फरन्सींगद्वारे घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार आणि प्राथमिक माहितीनुसार  राज्यात सुमारे ३२५ तालुक्यांमधील ५४ लाख २२ हजार हेक्टरवरील पीके बाधित झाली आहेत.विभागनिहाय झालेले नुकसान पुढील प्रमाणे  : कोकण (४६ तालुके/ ९७ हजार हेक्टर), नाशिक (५२ तालुके/१६ लाख हेक्टर), पुणे (५१ तालुके/१.३६ लाख हेक्टरहून अधिक), औरंगाबाद (७२ तालुके/२२ लाख हेक्टर), अमरावती (५६ तालुके/१२ लाख हेक्टर), नागपूर (४८ तालुके/४० हजार हेक्टर).साधारणत: ५३ हजार हेक्टरवर फळपिके, १ लाख ४४ हजार हेक्टरवर भात, २ लाख हेक्टरवर ज्वारी, २ लाख हेक्टरवर बाजरी, ५ लाख हेक्टरवर मका, १९ लाख हेक्टरवर सोयाबीन आणि सुमारे तितक्याच हेक्टरवरील कापूस पीकाचे नुकसान झाले आहे.

Previous article“आता आम्ही जगावं की मरावं” ? शेतक-यांनी मांडली शरद पवारांसमोर व्यथा
Next articleसत्तास्थापनेचा पोरखेळ थांबवा : शरद पवार