तीन दिवसात पंचनामे पूर्ण करा : मुख्यमंत्री

तीन दिवसात पंचनामे पूर्ण करा :मुख्यमंत्री

मुंबई नगरी टीम

 अकोलाऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारी पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. हाती आलेले निघून गेल्याने शेतकरी वर्ग निराशेच्या छायेत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी पंचनाम्यासाठी संवेदशीलपणे कार्य करावे. शेतकऱ्यांना तातडीने मदत व्हावी, यासाठी शेतपिकांचे येत्या तीन दिवसांत पंचनामे पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

मुख्यमंत्री  फडणवीस यांनी आज म्हैसपूर फाटा, लाखनवाडा, कापशी, चिखलगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन पिक पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बैठक घेतली.ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जवळपास शंभर टक्के शेत पिकांचे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, तूर ही पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शासकीय यंत्रणेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पंचनाम्याची कामे तातडीने हाती घ्यावीत. पंचनाम्यांची परिस्थिती हाताळण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणेने संवेदनशीलपणे कामे करावीत.पंचनाम्याच्या कामासाठी आवश्यकता असल्यास इतर विभाग आणि कृषि विद्यापीठाच्या मनुष्यबळाचा उपयोग करावा असे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.

यावेळी झालेल्या नुकसानीची व्याप्ती सर्वात मोठी आहे. त्यामुळे यामध्ये देण्यात येणारी मदतही मोठी असणार आहे. शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी दुष्काळ काळातील सर्व मदत ओला दुष्काळाच्या काळातही सर्व शेतकऱ्यांना देण्यात येईल. नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना पीक विमा आधार ठरणार आहे. पीक विम्याबाबत शेतकऱ्यांना एकत्रित सूचना देण्यात याव्यात. पीक विम्याचा लाभ देताना कंपन्यांनी विम्याच्या पावतीचा आग्रह करू नये. पीक विम्याच्या मदतीसाठी करावे लागणारे अर्ज गावातच भरून घ्यावे. पीक विमा कंपन्याचे प्रतिनिधी नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पोहोचू शकल्या नसल्यास शासकीय यंत्रणांनी केलेले पंचनामे त्यांनी ग्राह्य धरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पीक विम्याची मदत मिळण्यासाठी शासकीय यंत्रणेने समन्वयाने कार्य करावे. नुकसानीचा फोटोही मदतीसाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

हाताशी आलेले संपूर्ण पीक गेल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आली आहे. शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी अधिकारी-कर्मचारी यांनी अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन दिलासा देण्याचे काम करावे. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठिशी उभे राहू. शेतकऱ्यांना कोणत्याही वसुलीला सामोरे जावे लागू नये, याबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना सूचना कराव्यात. शेतकऱ्यांना सुलभपणे मदत मिळावी, त्यांना सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी हेल्पलाईन सुरू करावी. शेतपिकांच्या नुकसानीची व्याप्ती ही सार्वत्रिक आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक मदत राहणार आहे. योग्य व्यक्तींना या मदतीचा लाभ पोहोचावा, यासाठी यंत्रणेने अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन कार्य करावे. नुकसानीची मदत मिळण्यासाठी पंचनामा करणाऱ्या यंत्रणांनी अपवादही सोडू नये. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी यंत्रणेने हे आपले काम आहे, असे समजून मिशन मोडमध्ये कार्य करावे.

शेतकऱ्यांना ज्या मार्गांनी मदत करणे शक्य आहे, त्या सर्व मार्गांनी मदत करण्यात येईल. खरीप पिकांमधून कोणतेही उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती येणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यातील पावसामुळे पाण्याची मुबलक उपलब्धता झाली आहे. यामुळे शेतकरी आता रब्बी पिकाकडे वळतील. त्यांना हरभरा, गहू यासारख्या पिकांच्या बियाण्यांची उपलब्धता व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

Previous articleशेतक-यांनो खचून जाऊ नका ; शिवसेना तुमच्या पाठीशी
Next articleदलित नवबौद्ध समाज राष्ट्रवादीकडे पुन्हा कसा येईल यासाठी प्रयत्न करणार