शिवसेना नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई नगरी टीम
मुंबई: सत्तेचा तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत असतानाच मुख्यमंत्रीपदावर ठाम असलेल्या शिवसेनेचे नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि खासदार संजय राऊत यांनी भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.आजची ही भेट सदिच्छा होती. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.राज्यपालांपुढे आम्ही आमची भूमिका मांडली असून, सरकार स्थापनेमध्ये शिवसेनेचा अडथळा ठरत नसल्याने लवकरात लवकर राज्यात सरकार स्थापन व्हावे अशी मागणी केल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर दिली.
राज्यातील निवडणुकांचा निकाल लागून १० दिवसांच्यापुढे कालावधी उलटूनही राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसतानाच मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेचे नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर ही एक सदिच्छा भेट होती. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगतानाच सरकार स्थापनेत शिवसेनेचा अडथळा ठरत नसल्याचे या नेत्यांनी सांगून, राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावे अशी मागणी केल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर दिली.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावतीने आम्ही आज राज्यपालांची भेट घेतली.यावेळी राज्यपालांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फटकारे आणि उद्धव ठाकरे यांची दोन पुस्तके भेट दिली. राज्यपालांनी या दोन्ही पुस्तकांचे कौतुक केले. राज्यपाल हे तटस्थ असतात त्यामुळे सरकार स्थापनेबाबतचा निर्णय ते घेतील.आम्ही फक्त आमची भूमिका मांडली आणि राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली असेही राऊत म्हणाले.