सत्तेची कोंडी फुटणार ! मुख्यमंत्र्यांसह काही मंत्री शपथ घेणार ?
मुंबई नगरी टीम
मुंबई : गेल्या काही दिवसापासून शिवसेना भाजपातील सत्ता वाटपाचा तिढा सुटण्याची चिन्हे आहेत.उपमुख्यमंत्रीपदासह शिवसनेला महत्वाची खाती देवून पुढील दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तर शिवसेना भाजपातील १४ आमदार कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असून, याचा निर्णय उद्या होण्याची शक्यता असल्याचे समजते.
आज दिवसभर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून चर्चा केली. तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. नवी दिल्लीत शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.अमित शहा यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून चर्चा केल्यानंतर राज्यात निर्माण झालेल्या सत्ता स्थापनेची कोंडी फोडण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर आता गडकरी शिवसेना नेत्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करणार आहेत. मात्र या घडामोडी चालू असतानाच शिवसेना भाजपा या दोन्ही पक्षांची पडद्याआड बोलणी सुरू असून, सरकार स्थापन करण्याविषयी सरकारात्मक चर्चा सुरू असून, येत्या दोन दिवसात यावर अंतिम निर्णय होवून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर शिवसेना आणि भाजपाचे १४ आमदार कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेल्या सरकारमध्ये शिवसेनेला दुय्यम खाती देण्यात आल्याने शिवसेनेत प्रचंड नाराजी होती.आता सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हातात असल्याने शिवसेनेने ताठर भूमिका घेतल्याने सुरूवातीला नगरविकास, महसूल, अर्थ ही महत्वाची खाती देण्यास राजी नसलेले भाजपाचे नेते आता महसूल, अर्थ, सार्वजनिक बांधकाम आणि ग्रामविकास ही महत्वाची खाती शिवसेनेला देण्यास सकारात्मक असल्याचे समजते.राज्यातील सत्तेचा तिढा सोडविण्याची जबाबदारी नितीन गडकरी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या नियोजित ओला दुष्काळ दौ-यासाठी उद्या सकाळी दहा वाजता मराठवाडा दौ-यावर रवाना होणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील कंधार, अहमदपुर,गंगाखेड आदी ठिकाणी अवेळी पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. रात्री १० च्या सुमारास ते मुंबईत परतणार आहेत त्यानंतरच त्यांच्याशी भाजपाचे नेते संपर्क करू शकतात.उद्या मंगळवारी भाजपाच्या नेत्यांची मुंबईत महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीतच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.