देवेंद्र फडणवीस हे मावळते मुख्यमंत्री
मुंबई नगरी टीम
मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टिकास्त्र सोडतानाच देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत ते मावळते मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख केला आहे.
विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून बारा दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर काल दिल्लीत झालेल्या राजकीय घडामोडीमुळे राज्यातील सत्तेचा तिढा सुटेल असे वाटत होते. मात्र शिवसेना आणि भाजपामधील सत्ता वाटपाचा वाद अद्यापही सुटला नाही. भाजपाने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला आहे तर मुख्यमंत्रीपदावर शिवेसना ठाम आहे. शिवेसेनेकडून भाजपावर दररोजच निशाणा साधला जात आहे.अशातच भाजपाकडून सबुरीचे धोरण स्वीकारले जात असतानाच आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री आणि भाजपावर टिकास्त्र सोडण्यात आले आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख देवेंद्र फडणवीस हे मावळते मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख केला आहे.बहुमताचा आकडा गोळा करण्यात अजून चार एक दिवस जातील पण ती कसरत म्हणजे दिल्लीच्या गढूळ धुक्यात विमान उतरविण्यासारखे असल्याचा टोला या अग्रलेखात करण्यात आला आहे.
सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे. नवे राज्य मोकळ्या वातावरणात येवो पण एकदाचे राज्य यावे ही अपेक्षा आहे. राज्याच्या जनतेने कौल दिला आहे. मराठी जनतेला कमी लेखू नका. दिल्लीच्या गढूळ वातावरणातून मावळते मुख्यमंत्री महाराष्ट्रात उतरतील तेव्हा त्यांना पुढचे पाऊल टाकावेच लागेल असेही या अग्रलेखात म्हटले आहे.