राज्यात महायुतीचेच सरकार येणार : मुनगंटीवार
मुंबई नगरी टीम
मुंबई : शिवसेना आणि भाजपात मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याचे सांगून उद्या गुरूवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने भाजपाने शिवसेनेवर दबावतंत्राचा वापर केल्याची चर्चा आहे.दुसरीकडे उद्या शिवसेनेच्या आमदारांची तातडीची बैठक मातोश्रीवर होणार असल्याने या बैठकीत होणा-या सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम असतानाच शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,अर्खमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या गुरूवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेवून चर्चा करणार आहेत. भाजपाचे नेते राज्यपाल यांची भेट घेवून चर्चा करणार आहेत मात्र सरकार स्थापन करण्याचा दाववा करणार की नाही याबाबत संभ्रम आहे. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर लगेच मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपाच्या कोअर समितीची बैठक पार पडली. याबैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे आदी नेते उपस्थित होते. बैठकीत संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाली असल्याची माहिती देवून मुनगंटीवार यांनी देवून भाजपाचे नेते उद्या राज्यपालांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगतानाच राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिला असल्याने आमचेचे सरकार येणार असल्याचा दावा त्यांनी केला.आमचा फॉर्म्युला ठरला आहे.असणारी नाराजी लवकरच दूर होऊन गोड बातमी मिळेल असे ते म्हणाले.आम्ही कधीही वेगळा विचार केला नाही असेही मुनगंटीवार म्हणाले.भाजपाच्या या नव्या भूमिकेमुळे शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची तातडीची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातेश्रीवर बोलावली आहे.या बैठकीत होणा-या निर्णयावर पुढील दिशा ठरणार असली तरी शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने भाजपापुढे सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे.