शिवसेना भाजपाला कौल दिल्याने त्यांनी सरकार स्थापन करावे

शिवसेना भाजपाला कौल दिल्याने त्यांनी सरकार स्थापन करावे

मुंबई नगरी टीम

मुंबई :  शिवसेना- भाजपाची युती २५ वर्षांपूर्विपासूनची आहे.राज्यातील जनतेने त्यांना सरकार स्थापनेचा कौल दिला आहे, त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर सरकार बनवावे.राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला विरोधी पक्षांची भूमिका बजावण्याचा कौल मिळाला आहे. आम्ही आमची ती भूमिका बजावण्यास सिद्ध आहोत असे आज राष्ट्रावादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे जाहीर केले.

 येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार हे बोलत होते.राज्यातील निवडणुकांचा निकाल लागून १४ दिवसांचा कालावधी उलटून गेला असतानाही शिवसेना भाजपातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम असल्याने शरद पवार यांच्या आज होणा-या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कांग्रेस आणि आम्ही एकत्र निवडणुका लढलो त्यामुळे आम्ही एकत्र आहोत आमची एकत्र भूमिका असेल काँग्रेसला सोडून आम्ही वेगळा निर्णय घेणार नाही असे पवार यांनी सांगून मी चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलो आहे,आता मुख्यमंत्री होणार नाही असेही स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना भाजपात रस्सीखेच सुरू असली तरी गेल्या २५ वर्षांपासून एकत्र असलेले सेना- भाजप एकत्रच येतील असेही पवार  म्हणाले.राज्यातील जनतेने शिवसेना भाजपाला कौल दिला असल्याने त्यांनी सरकार स्थापन करावे आम्हाला विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचा कौल दिल्याने आम्ही विरोधकाची भूमिका बजावण्यास सिद्ध असल्याचे पवार यांनी स्पष्ट करून राज्यात युतीने सरकार स्थापन करावे असे सांगितले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल ही भीती फक्त शिवसेनेला वाटते आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.आपल्याकडे कोणीही प्रस्ताव घेऊन आले नाही. आमच्याकडे आवश्यक संख्याबळ असते तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापन केले असते.मात्र तसे ते झाले नाही असेही पवार म्हणाले.

भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व काँग्रेसचे  पटेल यांची भेट झाली याबाबत अहमद पटेल हे जबाबबदार नेते आहेत असे पवार म्हणाले. भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राज्यात सरकारे स्थापन करण्याबाबत खासीयत आहे याकडे लक्ष वेधता शहा यांच्या कौशल्याची वाट पाहात आहोत असेही पवार म्हणाले.दिल्लीत गणवेशातील पोलिसांवर हल्ले होणे  याचा परिणाम  पोलिसांचे नैतिक धैर्य खच्ची होण्यात होईल. केंद्र सरकारने तातडीने याबाबत पावले उचलली पाहिजेत.दिल्लीतील संघर्ष मिटावा यासाठी बार कौन्सिल अध्यक्षांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही पवार यांनी केले.राज्यातील अतिवृष्टीग्रस्त विभागात पाहणी करण्यासाठी जाणार आहे. शेतक-यांसाठी केंद्राकडून काही मदत मिळावी यासाठीही प्रयत्न करणार आहे. राज्यातील शेतक-यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, विशिष्ट रकमेपर्यंत कर्जमाफी मिळावी, तसेच नविन पिकासाठी कर्ज मिळावे अशा मागण्याही त्यांनी केल्या. विमा कंपन्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडावे यासाठी केंद्र सरकारने विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची तातडीने बैठक बोलवावी अशी मागणीही त्यांनी केली. अयोध्या प्रकरणी निकाल जाहीर होताच तो आपल्या विरोधातील असे कोणत्य़ाही समाजाने समजू नये,बाबरी मशिद पडली त्याकाळासारखे वातावरण होऊ नये असे आवाहन पवार यांनी केले.अयोध्या प्रकरण न्यायालयात असल्यापासून गेली काही वर्ष उभय बाजूंची न्यायालयाचा निर्णय मान्य करण्याची भूमिका दिसते. मात्र निकालानंतर कोणीही कायदा हाती घेणार नाही हे पाहण्याची गरज आहे असेही आवाहनही त्यांनी केले.

Previous articleपोशिंदा उभा राहिला नाही तर हे सरकार पडेल
Next articleराज्यात महायुतीचेच सरकार येणार : मुनगंटीवार