मंत्र्यांच्या दालनात आवराआवर सुरू
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील सत्ता पेच कायम असतानाच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होताच सामान्य प्रशासन विभागाने मुख्यमंत्री,मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या पदाचा कार्यभार संपुष्टात आल्याने त्यांची दालने व कार्यालयातील कागदपत्रे, नोंदवह्या फर्निचर आदींची आवराआवर करण्याच्या व कार्यालयाचा ताबा सुपूर्द करण्याचा आदेश जारी केल्याने आज दिवसभर मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनात आवराआवर करण्याची लगबग सुरू होती.
राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर राज्यात शिवसेना भाजपा सरकार येणार अशी चर्चा होती मात्र मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षात सुरू झालेला वाद संपुष्टात न आल्याने राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला सरकार स्थापनेसाठी विचारणा केली असता त्यांनी सत्ता स्थापनेस नकार दिला तर शिवसेनेला अपेक्षित पाठिंब्याची पत्रे न मिळाल्याने शिवसेनेने सरकार स्थापनेचा दावा केला असला तरी सरकार बनवू शकले नाही त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपतींना पाठविला नंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.त्यानंतर आज सामान्य प्रशासन विभागाने एक परिपत्रक काढून मुख्यमंत्री,मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या पदाचा कार्यभार संपुष्टात आल्याने त्यांची दालने व कार्यालयातील कागदपत्रे, नोंदवह्या फर्निचर आदींची आवराआवर करण्याच्या व कार्यालयाचा ताबा सुपूर्द करण्याचा आदेश जारी केले आहेत. त्यानंतर मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयासह, मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या दालनात आवराआवर सुरू झाली आहे. मंत्र्यांच्या दालनातील साहित्य,कागदपत्रे आणि फर्निचर इतरत्र हालविण्यास सुरूवात करण्यात आली आहे.मंत्र्यांच्या दालने रिकामी करण्याची लगबग सुरू असली तरी मंत्र्यांच्या दालनाबाहेर असलेले नावाचे फलक मात्र तसेत होते.मंत्र्यांच्या नावचे फलक काढण्याचे काम आस्थापना विभागाकडून लवकरच सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले.त्यामुळे येत्या एक दोन दिवसात मंत्र्यांची दालने रिकामी करण्यात येईल.
आधीच्या सरकारमधील सर्वांनाच आपले बंगले आणि कार्यालय करावी लागणार आहेत. सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि राज्यमंत्र्यांना सरकारी सुविधा पुरविल्या जातात. त्यामध्ये मंत्र्याचे बंगले, कार्यालय, गाड्या या सुविधा असतात. पण कार्यकाळ संपल्यानंतर या सुविधा सामान्य विभाग प्रशासनाला परत द्यावा लागतात. यांच्यामार्फत आज सर्वाची यादी केली जाईल. त्यानंतर यादीनुसार सर्व सामान पाहून ते जमा केले जाईल.