भाजपने निर्लज्जपणाचा कळस गाठला : अहमद पटेल
मुंबई नगरी टीम
मुंबई : रात्रीच्या अंधारात काळे कारनामे करून आज सकाळी कोणालाही न सांगता लपून छपून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यावरून यामागे काळेबेरे आहे, हे निश्चित आहे. भाजपने निर्लज्जपणाचा कळस गाठला असून संविधानाची पायमल्ली केली जात आहे. आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या अक्षरात लिहीला जाईल अशी घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. अहमद पटेल यांनी केली आहे.
काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते.आजच्या बैठकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेता व अन्य पदाधिकारी निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष सोनियाजी गांधी यांना देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी मांडला. या प्रस्तावाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, व विजय वडेट्टीवार यांनी अनुमोदन दिले आणि हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, आज सकाळी सकाळी कोणालाही न सांगता लपून छपून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यांच्याकडे बहुमताचा आकडा आहे का? याची खात्रीही राज्यपालांनी केलेली दिसत नाही. ज्या राजकीय घटना सकाळपासून सुरु आहेत त्यावरून यामागे काळेबेरं असून संविधानाची पायमल्ली केली जात आहे हे स्पष्ट आहे. भारतीय जनता पक्षाने निर्लज्जपणाचा कळस गाठला असून काँग्रेस पक्ष याचा तीव्र शब्दांत निषेध करत आहे. राज्यात स्थिर सरकार देण्याबाबत शुक्रवारी आमची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली होती. आजही बैठक होणार होती पण त्यापूर्वीच या घटना घडल्या आहेत. आम्ही तिन्ही पक्ष सोबत आहोत. काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार पक्षासोबत आहेत. आमचा एकही आमदार फुटणार नाही. आम्ही राजकीय आणि न्यायालयीन लढाई लढू असे पटेल म्हणाले.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना फोन केला त्याच्या दुस-या दिवशी सकाळी आम्ही मुंबईत पोहोचलो होतो आणि सरकार स्थापणेबाबत चर्चा सुरु केली होती. काँग्रेस पक्षाकडून कोणताही उशीर झाला नाही असे त्यांनी स्पष्ट केले.