सरकार पाच वर्षे मजबुतीने काम करेल : मुख्यमंत्री 

सरकार पाच वर्षे मजबुतीने काम करेल : मुख्यमंत्री

मुंबई नगरी टीम

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राज्यात सरकार पाच वर्षे मजबुतीने काम करेल आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

भाजपा विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते मा. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ राजभवन येथे घेतली. त्यानिमित्त मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यावेळी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री विनोद तावडे, गिरीश महाजन, आशिष शेलार आणि हर्षवर्धन पाटील तसेच शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष मा. विनायक मेटे व्यासपीठावर उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुतीतील आपले मित्र, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले, शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायकराव मेटे, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत. आपले एक मित्र सोबत राहीले नाहीत. मात्र आपली बांधिलकी महाराष्ट्रातील जनतेशी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या  अजित पवार यांच्या समर्थनातून एक मजबूत सरकार देण्याकरता निर्णय घेतला आहे. पाच वर्षे अत्यंत ताकदीने आणि मजबुतीने हे सरकार काम करेल, छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातील महाराष्ट्र तयार कऱण्याकरता आणि विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी हे सरकार काम करेल, असा विश्वास आपण देतो असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आपले सरकार स्थापन झाले, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांच्या सहीचे पत्र आपल्याला सरकार स्थापनेसाठी समर्थन म्हणून दिले, त्यांचे आपण अभिनंदन करतो. सरकार स्थापनेसाठी समर्थन देणाऱ्या सर्व अपक्ष आणि विविध पक्षांच्या आमदारांचेही आपण अभिनंदन करतो.यावेळी त्यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष  अमित शाह आणि भाजपा कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डा यांचे आभार मानले.

Previous articleभाजपने निर्लज्जपणाचा कळस गाठला : अहमद पटेल
Next articleअखेर विधिमंडळ पक्षनेतेपदावरून अजित पवारांची हकालपट्टी