अखेर विधिमंडळ पक्षनेतेपदावरून अजित पवारांची हकालपट्टी
मुंबई नगरी टीम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी बंड करून उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले अजित पवार यांची अखेर राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येवून,व्हिप काढण्याचे अधिकार जयंत पाटील यांच्याकडे देण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीला जोरदार झटका देवून राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेत आज सकाळी उपमुख्मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. आज दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आज रात्री यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत अजित पवार यांची अखेर राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अजित पवारांचे व्हिप काढण्याचे अधिकार काढून घेण्यात आले असून, ते अधिकार जयंत पाटील यांच्याकडे देण्यात आले आहेत. तर अजित पवारांवर कारवाई करण्याचे सर्वाघिकार शरद पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.