अजित पवारांशी माझा काहीच संबंध राहिलेला नाही : धनंजय मुंडे
मुंबई नगरी टीम
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार हे जो पर्यंत राष्ट्रवादी पक्षात होते. तोपर्यंत ते माझे नेते होते आणि आमच्याशी त्यांचे संबंध होते.मात्र सध्या ते राष्ट्रवादीत नसल्याने अजित पवार यांच्याशी माझा कसलाही संबंध राहिलेला नाही, असे आमदार धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुका या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या. त्यावेळी अजित पवार हे आमच्यासोबत होते. मात्र सध्या ते भाजपाच्या सरकार मध्ये उपमुख्यमंत्री असून, आमच्या पक्षाबरोबर नाहीत. अजित पवारांवर माझे वैयक्तिक स्नेहाचे संबंध असले तरी मात्र माझे अंतिम प्रेम आणि निष्ठा ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी आहे, मी मरेपर्यंत शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिल, असे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. आझा आणि त्यांचा संबंध ते ते पक्षात होते तोपर्यंत होता. आता माझा त्यांच्याशी कसलाही संबंध राहिलेला नाही.असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार धनंजय मुंडे यांची ओळख अजित पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून आहे. धनंजय मुंडे यांना भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यात अजित पवारांची महत्वाची भूमिका होती. मात्र शनिवारी करण्यात आलेल्या अजित पवारांच्या बंडावेळी मुंडे यांच्या बंगल्यातून सर्व सूत्रे हलविली गेल्याने तसेच बंडाच्या दिवशी मुंडे कोणाच्याही संपर्कात नसल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.शनिवारी दुपारी मी एक वाजेपर्यंत झोपलेलो होतो. त्यामुळे यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये येण्यास मला उशिरा झाला.माझ्या बंगल्यावरुन कोणाला फोन गेले याची मला कल्पना नाही.असे त्यांनी सांगितले. मी पक्षाशी आणि शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गट वैगेर काही नाही आम्ही सर्व एक आहोत” असेही मुंडे सांगितले.