आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती

आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती

मुंबई नगरी टीम

मुंबई  : गोरेगाव येथील आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आली असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली आहे. मात्र मुंबई मेट्रोच्या कामाला  स्थगिती दिलेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईचे वैभव नष्ट करून विकास होणार असेल तर मला असा विकास नको. विकासकामांना मी कोणताही खोडा घालणार नाही. मात्र, रातोरात झाडांची कत्तल करणे मला मंजूर नाही. त्यामुळे झाडे तोडण्याबरोबरच इतर कामाला स्थगिती दिली आहे. त्याचे संपूर्ण पुनर्परीक्षण झाल्याशिवाय पुढील काम न करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आल्याची घोषणा केली.ठाकरे कुटुंबाने स्वतःसाठी काहीही केले नाही हे आपणा सर्व पत्रकांराना माहित आहे.मी काहीही न सांगता मुख्यमंत्री झालो आहे. महागाई, भ्रष्टाचार, टंचाई या सगळ्याचा सामना आम्हाला करायचा आहे.मी मुख्यमंत्री म्हणून येईन असे कधीही सांगितले नव्हते असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.महागाई,टंचाई आणि भ्रष्टाचाराचा सामना महाराष्ट्र विकास आघाडीला करायचा आहे. मंत्रालयातल्या परंपरा, प्रथा मला ठाऊक नाहीत तरीही हे शिवधनुष्य उचलले आहे  कराच्या रुपाने येणारा पैसा आपण कसा खर्च करतो, याचे उत्तर जनतेला द्यायचे आहे असे सांगतानाच मोठी आव्हाने पाहून मी पळून गेलेलो नाही. हे आव्हान स्वीकारले आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज शुक्रवारी मंत्रालयात आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी मंत्रालयातील कर्मचारी- अधिकारी यांनी मंत्रालयात त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. मंत्रालयात पोहचण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौकातील संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. दुपारच्या सुमारास त्यांचे मंत्रालयात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी मंत्रालयातील तळमजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सहाव्या मजल्यावर जावून उद्धव ठाकरे यांनी  पदभार स्वीकारला. मुख्यमंत्री कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचे औक्षण करत स्वागत केले. यावेळी त्यांच्यासमवेत नवनियुक्त मंत्री सुभाष देसाई, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, एकनाथ शिंदे आणि नितीन राऊत उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांसह विविध विभागातील सचिव, सहसचिव यांच्यासोबत बैठक घेत कामकामाजाचा आढावा घेतला. सुमारे दोन तास त्यांनी सचिवांसमवेत चर्चा केली.जनतेने शासनावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि महाराष्ट्राला देशात अग्रेसर करण्यासाठी विकासकामे करतांना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव अजय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि विविध विभागाचे सचिव उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, जनतेने दिलेल्या करातून विकास कामांसाठी निधी प्राप्त होत असतो.  निधीचा योग्यप्रकारे विनियोग करून विकासाला गती देणे आवश्यक आहे. सेवाभावनेने कामे केल्यास जनतेचा विश्वास संपादन करता येईल. सरकार माझे आहे अशी विश्वासाची भावना जनतेच्या मनात निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.  जनतेने विश्वासाने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविली आहे. राज्याला मुंबईत जन्मलेला पहिला मुख्यमंत्री मिळाला असल्याने मुंबईसह राज्याला देशात अग्रेसर करण्याचे स्वप्न घेऊन यापुढे काम करावयाचे आहे. विकास कामांसाठी निधी देताना करदात्याचे उत्पन्नही वाढेल याकडेदेखील लक्ष देणे तेवढेच महत्त्वाचे आहे.  त्याचबरोबर शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवावा. जनसेवेसाठी पारदर्शक आणि स्वच्छ कारभारावर अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.  शासन आणि प्रशासनाबद्दल जनतेच्या मनात आपुलकीची आणि आदराची भावना निर्माण होण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वांगीण विकास साधताना कामांची गती आणि दिशेलाही तेवढेच महत्त्व आहे.  त्यादृष्टीने प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. अधिकारी आपल्या जबाबदारीचे सक्षमपणे निर्वहन करतील आणि प्रगतीचे उद्दिष्ट गाठण्यास शासन यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Previous articleमी…उद्धव बाळासाहेब ठाकरे…….मुख्यमंत्री
Next articleराज्यातील तीन नगरपंचायतींसाठी २९ डिसेंबरला मतदान