मी…उद्धव बाळासाहेब ठाकरे…….मुख्यमंत्री

मी…उद्धव बाळासाहेब ठाकरे…….मुख्यमंत्री

मुंबई नगरी टीम

मुंबई : शिवतीर्थावर आज महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी योहळा मोठ्या दिमाखात  पार पडला.या शपथविधी सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्याचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली.शिवसेना नेते सुभाष देसाई,एकनाथ शिंदे,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,छगन भुजबळ तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी  मंत्रिपदाची शपथ घेतली.या शपथविधी सोहळ्याला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक पक्षांचे अध्यक्ष नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवतीर्थावर आज झालेल्या ऐतिहासिक सोहळ्यात शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.मी…उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की, असे म्हणताच शिवतीर्तावर एकच जल्लोष झाला. शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्तावर जमलेल्या  उपस्थितांना  दंडवत घातला.उद्धव ठाकरे यांनी आई वडिलांच्या स्मृतींना स्मरुन शपथ घेतली.शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत मंत्रीपदाची शपथ घेतली.शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन मंत्रीपदाची शपथ घेतली.राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी वडिलांसोबत आईचे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेऊन मंत्रीपदाची शपथ घेतली.राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शपथ घेण्याआधी जय महाराष्ट्र, जय शिवराय असा नारा दिला.महात्मा फुले, सावित्री फुले, शाहू महाराज, बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे नाव घेत मंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेत ईश्वर साक्ष शपथ घेतली तर नितीन राऊत यांनी डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे नाव घेऊन मंत्रीपदाची शपथ घेतली.

या शपथविधी सोहळ्याला देशभरातले दिग्गज नेते उपस्थित होते.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ,काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, कपील सिब्बल, एम. के स्टॅलीन, शंकरसिंह वाघेला. यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दाखवली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सहकुटूंब या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील हे या शपधविधी समारंभाला उपस्थित होते.

 

नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा परिचय

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 महाराष्ट्राचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे  उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. गेल्या अनेक दशकांपासून मराठी माणूस, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या श्री. ठाकरे यांना त्यांचे वडील शिवसेनेचे संस्थापक स्व.बाळासाहेब ठाकरे, आई स्व.मीनाताई आणि आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभला आहे.

शिवसेना प्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांनी पायाभरणी केलेल्या आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाची धुरा ठाकरे यांनी मुख्य संपादक म्हणून सांभाळली.

२७ जुलै १९६० रोजी मुंबईमध्ये जन्म झालेले  उद्धव ठाकरे जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् चे स्नातक असून त्यांच्या छायाचित्रांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. एक सिद्धहस्त लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या श्री. ठाकरे यांच्या कलाकृतींची दखल अनेक नामवंत मासिकांनी वेळोवेळी घेतली आहे. तसेच त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या  छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून रसिकांना घडले आहे.

राजकीय कारकीर्द

उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात विद्यार्थी दशेपासून झाली. शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रीय असलेल्या  ठाकरे यांच्याकडे २००२ च्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आली आणि महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत त्यांनी ती यशस्वीरीत्या पूर्ण केली. या निवडणुकीने त्यांच्यातील राजकीय नेतृत्वगुण संपूर्ण राज्याने अनुभवले. २००३ मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि २००४ मध्ये त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषीत केले.

व्यक्तीगत जीवन

उद्धव ठाकरे यांचा विवाह सौ. रश्मी यांच्याशी झाला असून त्यांना आदित्य आणि तेजस अशी दोन मुले आहेत. आदित्य ठाकरे आजोबा आणि वडिलांचा राजकारणाचा वसा पुढे चालवित आहेत.  ते सध्या  युवा सेनाप्रमुख असून वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

कलात्मक पैलू

महाराष्ट्राच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौंदर्याचे मूर्तीमंत आणि विहंगम छायाचित्रण त्यांच्या ‘महाराष्ट्र देशा’ या २०१० ला प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दिसून येते. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिकतेचा मानबिंदू असलेल्या ‘पंढरपूर वारी’चे आणि ग्रामीण महाराष्ट्राचे यथार्थ छायाचित्रण त्यांच्या ‘पहावा विठ्ठल’ या २०११ मधील पुस्तकाच्या माध्यमातून देशालाच नव्हे तर जगाला भूरळ घातली. आपल्या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी निधी उभारून त्यांनी मदत केली.

योगदान

  • शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेनेला अधिक सर्वसमावेशक करतानाच आधुनिकतेशी त्यांनी शिवसेनेला जोडले. युवक, कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्यभर चालविलेल्या विविध आंदोलनांना यश आले.
  • ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने कार्य करणाऱ्या शिवसेनेच्या समाजकारणाची दखल गिनीज बुकने घेतली आहे.
  • ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मलेरिया आजारासाठी चाचणी आणि उपचार केंद्र सुरू करून गरजूंसाठी औषध पुरवठाही सुरू केला.
  • मुंबईमधील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने अनेक रूग्णालयांचे निर्माण.
  • विविध रक्तदान महाशिबिरांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण समाजकार्याची पायाभरणी.
  • २००२ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी आणि विजयाचे शिल्पकार. महाराष्ट्रात पक्षविस्तार केल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश. गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील आणि केंद्रातील सरकारांमध्ये शिवसेना एक प्रमुख घटकपक्ष म्हणून सहभागी. राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला भरघोस यश. उद्धव ठाकरे यांनी २००७ मध्ये विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी यशस्वी मोहीम राबवली.
  • उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कल्याणावर लक्ष केंद्रीत करीत आपल्या पक्षाचा विस्तार वाढविला आणि राज्यानेही त्यांचे नेतृत्व स्वीकारले.
  • संवेदनशील लेखक आणि छायाचित्रकार असलेल्या  उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले आणि पक्षाला आजचे सुसंघटित रुप दिले. महाराष्ट्राला विविध आघाड्यांवर पुढे घेऊन जाणारे नेतृत्व  उद्धव ठाकरे यांच्या रूपाने लाभले आहे.

मंत्री

नाव                         :  एकनाथ संभाजी शिंदे

जन्म                        : ६ मार्च, १९६४

जन्म ठिकाण          : दरेगांव, तालुका जावळी, जिल्हा सातारा.

शिक्षण                     : एच.एस.सी.

ज्ञात भाषा               : मराठी, हिंदी व इंग्रजी

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती लता

अपत्ये                     : एकूण 1 (एक मुलगा)

व्यवसाय : उद्योग/सामाजिक कार्य

पक्ष                          : शिवसेना

मतदारसंघ             : कोपरी-पाचपाखाडी, जिल्हा ठाणे

इतर माहिती           : संपुर्ण ठाणे शहर व जिल्ह्यात सामाजिक कार्याचे जाळे निर्माण केले; ठाणे शहरात ओपन आर्ट गॅलरी, सचिन तेंडुलकर मिनी स्टेडिअम, इंटरर्निटी सुविधा भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, शहीद हेंमत करकरे क्रीडा संकुल, जॉगिंग पार्क,  सेंट्रल लायब्ररी सुरू केली; आदिवासी प्रभाग मोखाडा, तलासरी व जव्हार येथील आश्रमशाळेत व आरोग्य केंद्रात सकस आहार व आरोग्य तापसणी श्बिीरांचे आयोजन करून रूग्णांना विनामूल्य औषध वाटप केले; पालघर, बोईसर व सफाळे परिसरात शिवसेनेतर्फे एस.एस.सी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन; गरीब विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप; पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप; वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन; अध्यक्ष, ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन; उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स संघटना; पूरग्रस्तांना मदत; ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व आधुनिकीकरणासाठी विशेष योगदान; शिवसेना शाखा प्रमुख, वागळे इस्टेट, किसननगर नं.२, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख; पक्षाच्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग, दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य, चार वर्षे सभागृह नेता, ठाणे महानगरपालिका; २००४-२००९, २००९-२०१४ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; १२ नोव्हेंबर २०१४ ते ५ डिसेंबर २०१४ विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा; २०१४-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; डिसेंबर, २०१४ ते ऑक्टोबर, २०१९ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री, ऑक्टोबर २०१९ मध्ये विधानसभेवर फेरनिवड.

 

नाव                         :  सुभाष राजाराम देसाई

जन्म                        : १२ जुलै, १९४२

जन्म ठिकाण          : मालगुंड, तालुका रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी

शिक्षण                     : एस. एस. सी., पत्रकारिता पदविका

ज्ञात भाषा               : मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराती

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सुषमा

अपत्ये                     : एकूण ३ (तीन मुलगे)

व्यवसाय : उद्योग

पक्ष                          : शिवसेना

मतदारसंघ             : महाराष्ट्र विधानसभा सदस्याद्वारा निर्वाचित

इतर माहिती           : १९८२ संस्थापक, ‘प्रबोधन गोरेगाव’ विश्वस्त संस्था; १९७३ आंतरशालेय क्रीडा महोत्सव व आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन; १९७३ शिवसेना रुग्णवाहिका सेवा गोरेगाव येथे सुरु केली; १९७७ प्रमुख कार्यवाह, मुंबई उपनगर मराठी साहित्य संमेलन; १९८९ विश्वस्त, प्रबोधन प्रकाशन; प्रकाशक, ‘दैनिक सामना’, साप्ताहिक ‘मार्मिक व ‘दोपहार का सामना’; १९९१ प्रबोधन क्रीडा भवनाची उभारणी; १९९२ मुख्य संयोजक, कोकण रेल्वे परिषद, खेड, जिल्हा रत्नागिरी; १९९९ प्रबोधन जॉगर्स पार्कची उभारणी; २००० मुख्य संयोजक, मुंबई फेस्टीवल व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत उत्सव; २००१ मुख्य संयोजक, ‘हर्बलवल्ड’ औषधी वनस्पतींचे प्रदर्शन व चर्चा सत्राचे आयोजन; २००२ मध्ये उल्लेखनीय सार्वजनिक कार्याबद्दल संभाजी प्रतिष्ठानतर्फे धर्मवीर पुरस्कार प्राप्त; २००३ सहारा विमानतळावर अश्वारूढ शिव प्रतिमेची स्थापना; २००४ प्रबोधन रक्तपेढी सुरु केली; 1966 शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसैनिक म्हणून कार्य; १९८४ शिवसेना नेता; १९९४ हिंदुत्वाच्या आधारे प्रचार केला या आक्षेपावरुन न्यायालयाने सदर विधानसभेवरील निवड अवैध ठरविली; २००४-०९, २००९-१४ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; २०१५-१६ सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषद; ५ डिसेंबर, २०१४ पासून महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री; जुलै २०१६ मध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेवर फेरनिवड.

नाव                         :  जयंत राजाराम पाटील

जन्म                        : १६ फेब्रुवारी १९६२

जन्म ठिकाण          : सांगली.

शिक्षण                     : बी. ई. (सिव्हील)

ज्ञात भाषा               : मराठी, हिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती शैलजा

अपत्ये                     : एकूण २ (दोन मुलगे)

व्यवसाय : शेती

पक्ष                          : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष .

मतदारसंघ             : इस्लामपूर ,जिल्हा-सांगली

इतर माहिती           : चेअरमन, राजारामबापू सहकारी साखर कारखाना लि; उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस; चेअरमन, कासेगाव शिक्षण संस्था; चेअरमन, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन; अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघ; संचालक, वसंतदादा शुगर इस्टिट्युट, पुणे; सदस्य, अखिल भारतीय साखर संघ, संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, सहकारी बँका, पतसंस्था, सहकारी सूतगिरणी, सहकारी ग्राहक भांडार, शेती पदवीधर संघ; कुक्कुटपालन सह. सोसायटी इत्यादी संस्था स्थापना करून जनसामान्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी व भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अथक परिश्रम घेतले; सदस्य, कार्यकारी मंडळ शिवाजी विद्यापीठ, सांगली जिल्हा व्यसनमुक्ती समिती व राजाराम बापू ज्ञान प्रबोधनी; कौन्सिल मेंबर, इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक कॉलेज, राजाराम नगर; सर्व संस्थाचे काम संगणकाच्या माध्यमातून करण्यामध्ये अग्रेसर; मे १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य; १९९०- ते २०१९ सदस्य , महाराष्ट्र विधानसभा ; नोव्हेंबर १९९९ ते डिसेंबर २००८ अर्थ व नियोजन खात्याचे मंत्री ; १९९९ पूर्वी विस्कटलेली राज्याची घडी योग्य मार्गावर आणण्यासाठी अर्थमंत्री म्हणून प्रदीर्घकाळ योगदान दिले; डिसेंबर २००८ मध्ये काही काळासाठी गृह खात्याचा कार्यभार; नोव्हेंबर २००९ ते ऑक्टोबर २०१४ ग्रामविकास खात्याचे मंत्री; प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष; ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.

 

नाव                         :  छगन चंद्रकांत भुजबळ

जन्म                        : १५ ऑक्टोबर १९४७

जन्म ठिकाण          : नाशिक.

शिक्षण                     : एल.एम.ई.(आय).

ज्ञात भाषा               : मराठी, हिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती मीना.

अपत्ये                     : एकूण १ (एक मुलगा).

व्यवसाय : शेती.

पक्ष                          : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

मतदारसंघ             : -येवला, जिल्हा नाशिक.

इतर माहिती           : संस्थापक अध्यक्ष, मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट, बांद्रा, मुंबई माजी विश्वस्त, व्ही. जे. टी. आय. संस्था, मंबई; संस्थापक, महात्मा फुले समता परिषद, या संस्थेमार्फत उपेक्षित पद दलित, मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न तसेच, महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहु महाराज यांच्या विचारांचा व आदर्शाचा प्रचार व प्रसारः १९७३ सदस्य, विरोधी पक्षनेते, महापौर, मुंबई महानगरपालिका, १९९१ पर्यंत शिवसेनेत, १९९१ नंतर काँग्रेस पक्षात कार्यरत, जून १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य संस्थापक सदस्य व जून १९९९ ते नोव्हेंबर १९९९ महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षः १९८५-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा. महसूल खात्याचे मंत्री;  गृहनिर्माण, गलिच्छ वस्ती सुधार, घरदुरुस्ती आणि पुनर्बाधणी खात्याचे मंत्री;  विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानपरिषद; महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृह आणि पर्यटन मंत्री, जानेवारी २००३ ते डिसेंबर २००३ उपमुख्यमंत्री व गृह मंत्री; नोव्हेंबर २००४ ते ऑक्टोबर २००९ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्रीः नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१० दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याचे मंत्री; नोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१४ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री; ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.

नाव                         :  विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

जन्म                        : ७ फेब्रुवारी, १९५३

जन्म ठिकाण          : जोर्वे, तालुका-संगमनेर, जिल्हा अहमदनगर.

शिक्षण                     : बी.ए. एल.एल.बी.

ज्ञात भाषा               : मराठी, हिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती कांचन.

अपत्ये                     : एकूण ४ (एक मुलगा व तीन मुली)

व्यवसाय :  शेती.

पक्ष                          : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय).

मतदारसंघ             : संगमनेर, जिल्हा अहमदनगर.

इतर माहिती           :  १९८५ ते २०१४-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा.विधी मंडळाच्या रोजगार हमी, आश्वासन, सार्वजनिक उपक्रम व पंचायत राज समित्यांचे सदस्य म्हणून काम केले; ऑक्टोबर, १९९९ ते जुलै, २००४ पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास खात्याचे राज्यमंत्री; नोव्हेंबर, २००४ ते ऑक्टोबर, २००९ जलसंधारण आणि खारजमीन खात्याचे मंत्री; नोव्हेंबर, २००९ ते नोव्हेंबर, २०१० कृषी जलसंधारण, रोजगार हमीयोजना आणि शालेय शिक्षण (अतिरिक्त कार्यभार) खात्याचे मंत्री; नोव्हेंबर, २०१० ते सप्टेंबर, २०१४ महसूल खार जमिनी खात्याचे मंत्री; राज्यभर शेततळ्यांची निर्मिती, सुवर्ण जयंती राजस्व अभियान सरू केले, खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप; महसूल खात्याचा कारभार ऑनलाईन करण्यात पुढाकार; राज्यातील शेत जमिनीचे नव्याने मोजणी करण्याचा निर्णय घेतला; ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.

नाव                         : डॉ. नितीन काशिनाथ राऊत

जन्म                        : ९ ऑक्टोबर १९५२.

जन्म ठिकाण          : नागपूर, जिल्हा नागपूर.

शिक्षण                     : एम ए., एफ.बी.एम., सी.पी.एल., एम.एफ.ए.(नाट्य) पीएच.डी.

ज्ञात भाषा               : मराठी, हिंदी व इंग्रजी

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती  सुमेधा

अपत्ये                     : एकूण २ (एक मुलगा व एक मुलगी)

व्यवसाय : उद्योग/व्यापार.

पक्ष                          : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय)

मतदारसंघ             : नागपूर (उत्तर)

इतर माहिती           :  १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचे सदस्य; आरक्षण अधिनियमासाठी गठित केलेल्या समितीचे सदस्य, वनोत्पादनाच्या चोरी संबंधीच्या संयुक्त समितीचे सदस्य; विधान मंडळाच्या रोजगार स्वयंरोजगार समितीचे सदस्य; मोरवाडा येथील पूरग्रस्त भागामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल वनराई संस्थेमार्फत पुरस्काराने सन्मानित, रत्नागिरी येथे आरक्षण विधेयकासाठी सन्मानीत, डिसेंबर २००८ ते नोव्हेंबर २००९ गृह, तुरुंग, राज्य उत्पादन शुल्क व कामगार खात्याचे राज्यमंत्री, ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.

Previous articleशेतक-यांना कर्जमाफी, बेरोजगारांना नोक-या देणार
Next articleआरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती