ठाकरे सरकार उद्या बहुमत सिद्ध करणार
मुंबई नगरी टीम
मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात स्वीकारला असून,उद्या शनिवारपासून सुरू होणा-या दोन दिवसीय विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.उद्या होणा-या बहुमत चाचणीसाठी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते सज्ज आहेत.तर दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने राज्यातील तीन दिवसाचे फडणवीस सरकार कोसळले होते. त्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीने राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला. काल शिवतीर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी ३ डिसेंबरची मुदत दिली आहे.मात्र त्यापुर्वीच राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने बहुमत सिद्ध करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार उद्या शनिवारी आणि रविवारी दोन दिवसीय विधिमंडळाचे विशेष अधिवेशन होत असून,या अधिेशनात बहुमत सिद्ध करण्यासाठी ठाकरे सरकार सज्ज झाले आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीकडे १७२ सदस्यांचे संख्याबळ असल्याचा दावा आघाडीचे नेत्यांनी केला आहे. त्यामुळे उद्याच्या अग्निपरिक्षेत ठाकरे सरकार सहज बहुमत सिद्ध करेल असे सध्या चित्र आहे.
विशेष अधिवेशनात राज्यपालांनी नियुक्त केलेले हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल.सभागृहाचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहा मंत्र्यांचा परिचय करून देतील त्यानंतर सदस्य सुनिल प्रभू, धनंजय मुंडे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रीमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे.”असा प्रस्ताव मांडणार आहेत.या विश्वासदर्शक ठरावावर हात उंचावून मतदान घेतले जाईल.तर रविवारी विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. रविवारी विरोधीू पक्ष नेत्यांची निवड करण्यात येणार आहे.अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे तर विरोधी पक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांनी निवड होण्याची शक्यता आहे.राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येवून, राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव मांडला जाणार आहे.