मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी मंत्रालयात अलोट गर्दी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी मंत्रालयात अलोट गर्दी

मुंबई नगरी टीम

मुंबई :  मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक मजल्यावर अलोट गर्दी पाहायला मिळाली.नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार असल्याने मंत्रालय सज्ज होते.उद्धव ठाकरे सहाव्या मजल्यावर जाऊन मुख्यमंत्री कार्यलयात मुंख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला.त्यांच्या आगमनापूर्वी मंत्रालयाचा परिसर अलोट गर्दीने फुलून गेला होता.

उद्धव ठाकरे हे राज्याचे २९वे मुख्यमंत्री ठरले आहेत. विशेष म्हणजे राज्याच्या इतिहासात ठाकरे परिवारातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्री झाली आहे.निवडणूक निकालानंतर महिनाभर चाललेल्या सत्तासंघर्षानंतर अखेर शिवसेना-राष्ट्रवादी -काँग्रेसच्या विकास आघाडीचे सरकार आले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी  आज मंत्रालयात पदभार स्वीकारला त्यावेळी देखील त्यांनी भगवा सदरा परिधान केला होता. ते मातोश्रीवरुन बाहेर पडल्यानंतर थेट हुतात्मा चौकात जावून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हुतात्मा झालेल्यांना आदरांजली वाहली. त्यानंतर ते  मंत्रालयात आले.त्यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते तसेच महाराष्ट्र विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मंत्रीही होते. शिवसैनिकांचा मोठा उत्साह ओसंडून वाहत होता.

सकाळी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील नावाची पाटी बदलण्यात आली. उद्धव बाळासाहेब ठाकरे असे संपूर्ण नाव पाटीवर लिहिण्यात आले आहे. उद्धव ठाकरे मंत्रालयात येण्यापूर्वीच ही सर्व तयारी करण्यात आली होती. सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रवेशद्वार फुलांनी सजवण्यात आले होते. प्रवेशद्वारावर फुलांची आरास करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी मंत्रालय आणि मंत्रालय परिसर गर्दीने फुलून गेला होता.त्यांचे मंत्रालयात आगमन झाले तेव्हा उद्धव ठाकरे यांना पाहण्यासाठी मंत्रालयाच्या सर्वच मजल्यावर अभ्यागत, कर्मचारी आणि अधिका-यांनी एकच गर्दी केली होती.

Previous articleठाकरे सरकार उद्या बहुमत सिद्ध करणार
Next articleउद्धव ठाकरे सरकारच्या बाजूने १६९ तर विरोधात शून्य मते