उद्धव ठाकरे सरकारच्या बाजूने १६९ तर विरोधात शून्य मते

उद्धव ठाकरे सरकारच्या बाजूने १६९ तर विरोधात शून्य मते

मुंबई नगरी टीम

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आज विशेष अधिवेशनात विश्वास दर्शक प्रस्ताव बहुमताने जिंकला. ठरावाच्या बाजूने १६९ मते पडली तर मतदानाच्या वेळी विरोधकांनी सभात्याग केला.मनसे,एम.आय.एम,आणि माकप पक्षाच्या ४ सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली. आवाजी मतदाने शिवसेना,कॅांग्रेस,राष्ट्रवादीसह अपक्ष आणि इतर पक्षांच्या आमदारांनी पाठिंबा दर्शविला.महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने बहुमताची चाचणी जिंकल्यानंतर सभागृहात सदस्यांनी बाके वाजवीत आनंद व्यक्त केला.विरोधकांनी सभात्याग केल्याने सरकारच्या विरोधात शून्य मते पडली.

आजपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बहुमत चाचणीचे कामकाज पार पडले.कामकाजाला सुरूवात होताच सत्ताधा-यांनी जय भवानी जय शिवाजी, बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो,तर भाजपने जय श्रीराम, वंदे मातरम अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत अधिवेशनच नियमबाह्य असल्याचा आक्षेप घेतला. आम्हाला रात्री एक वाजता समन्स प्राप्त झाले, बहुमत सिद्ध करण्यासाठी हे केले का असा सवाल त्यांनी उपस्थित करीत शिवाजीपार्क येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा पार पडलेला शपथविधी हा संविधानाने मान्य केल्यानुसार नव्हता अशी हरकत घेतली. यापूर्वी हंगामी अध्यक्षांची निवड झाली असताना पुन्हा हंगामी अध्यक्षांची निवड का केली अशी हरकत त्यांनी घेतली.त्यानंतर भाजपाच्या सदस्यांनी प्रचंड गोंधळ घालत दादागिरी नही चलेंगी अशी घोषणाबाजी केली.हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचा आक्षेप अस्विकृत करताना राज्यपालांच्या अनुमतीनेच कामकाज होत असल्याचे स्पष्ट करून आपली निवड हंगामी अध्यक्ष म्हणून केल्याचे राज्यपालांचे पत्रच वाचून दाखविले. त्यांनतर भाजप सदस्यांनी  अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत येवून घोषणाबाजी केली.तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन होत आहे याकडे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी लक्ष वेधले.अध्यक्षांनी पुढील कामकाज पुकारताच भाजपाच्या सदस्यांनी पुन्हा जोरदार गोंधळ घातला या गोंधळातच कॅांग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडताच भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला.

अशोक चव्हाण यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला राष्ट्रवादीचे सदस्य नवाब मलिक जयंत पाटील आणि शिवसेनेचे सदस्य सुनिल प्रभु यांनी अनुमोदन दिले.त्यानंतर अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी हा प्रस्ताव मतदानाला टाकला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री सुभाष देसाई हे विधानसभेचे सदस्य नसल्याने ते मतदानात भाग घेवू शकले नाहीत. मतदानाला सुरूवात होताच भाजपाच्या सदस्यांनी सभात्याग केला.आवाजी मतदानाने पार पडलेल्या या बहुमत चाचणीत महाराष्ट्र विकास आघाडीच्या बाजूने १६९ तर ४ सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली. तटस्थ राहिलेल्यामध्ये मनसेचे प्रमोद पाटील, माकपचे विनोद निकोले आणि एम.आय.एमचे डॅा. फारूख शहा आणि महंमद अब्दुल इस्माईल या चार आमदारांचा समावेश होता.भाजपाच्या सदस्यांनी सभात्याग केल्याने ठरावाच्या विरोधात शून्य मते पडली.बहुमत चाचणी पार पडताल्यानंतर अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा केली.सरकारने बहुमत चाचणी जिंकताच सभागृहात शिवसेनेच्या सदस्यांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.

सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडी मधिल शिवसेना ५६,राष्ट्रवादी ५३, कॅांग्रेस ४४, बहुजन विकास आघाडी ३,प्रहार जनशक्ती २,स्वाभिमानी पक्ष १,शेकाप १,समाजवादी पार्टी २ आणि अपक्ष ७ अशा १६९ सदस्यांनी सरकारच्या बाजूने तर भाजप १०५, जनसुराज्य शक्ती १,रासप १ आणि ७ अपक्षांनी सभात्याग केल्याने सरकारच्या विरोधात शून्य मते पडली.

Previous articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी मंत्रालयात अलोट गर्दी
Next articleमहापुरूषांबद्दल भाजपाला असूया: जयंत पाटील