महापुरूषांबद्दल भाजपाला असूया: जयंत पाटील
मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शिवतीर्थावर झालेला शपथविधी सोहळा नियमबाह्य असल्याचा आक्षेप भाजपाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असता याचा जोरदार समाचार राष्ट्रवादीचे नेते मंत्री जयंत पाटील यांनी घेतला.महात्मा ज्येतिबा फुले, छ. शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि डॅां बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भाजपाला असूया आहे असा आरोप राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केला.
सभागृहात जाणीवपूर्वक काम करण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. आज सभागृहात आनंदाची घटना घडत असताना छ. शिवाजी महाराज, डॅां. बाबासाहेब आंबेडकर.शाहू महाराज,महात्मा ज्योतिबा फुले या दैवतांच्या नावाचा उल्लेख केला तर देवेंद्र फडणवीस यांना का राग आला. फडणवीसांना दैवंतांबद्दल असूया आहे असा आरोप जयंत पाटील यांनी केला.कदाचित फडणवीस यांच्या मनातील राग बाहेर आला असावा असे सांगत,विरोधीपक्ष नेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यात स्पर्धा सुरू आहे असा टोला जयंत पाटील यांनी फडणवीस यांना लगावला.
तर मंत्री छगन भुजबळ यांनीही फडणवीस यांचा समाचार घेतला. दैवंतांची नावे घेतली आणि शपथ आहे तशी वाचली असे सांगून फडणवीस यांच्या आक्षेपात तथ्य नसल्याचे सांगितले.निवडणुक प्रचारात त्यांनी राज्यात प्रबळ विरोधी पक्ष हवा असे म्हणाले होते. आता त्यांना विरोधी पक्ष दिला असा टोला भुजबळ यांनी लगावला.तर बहुमत असल्याचे भाजपालाही माहित होते. त्यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानायला हवे होते.निवडणुक प्रचारात देवेंद्र फडणवीस म्हणायचे की, मला विरोधी पक्ष नेता दिसत नाही. त्यावेळी मी त्यांना म्हटले होते, फडणवीस तुम्ही आरशात उभे राहा तुम्हाला विरोधी पक्ष नेता दिसेल असे थोरातांनी सांगताच सभागृहात जोरदार हशा पिकला.