जो दैवताला मानत नाही तो जगायच्या लायकीचा नाही : मुख्यमंत्री
मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात भाजपाचा समाचार घेतला.सभागृहात येताना दडपण होते. सभागृहात आलो याचे भाग्य असून, छ. शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. पण दैवताला मानत नसाल तर तो जगण्याच्या लायकीचा नाही अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत पहिल्यांदा भाषण केले. विश्वासदर्शक ठराव जिंकल्याबद्दल त्यांनी राज्यातील जनतेचे आणि सदस्यांचे आभार मानले.जनतेच्या आशिर्वादाशिवाय हे शक्य नव्हते असेही ते म्हणाले.भाजपाचे विधिमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीवर आक्षेप घेत हे अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा आरोप केला होता.याचा समाचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला.आयुष्यात पहिल्यांदा या सभागृहात आलो आहे.सभागृहात येण्यापूर्वी दडपण होते, कारण सभागृहात कसे वागायचे हे मला ठाऊक नव्हते.मी मोकळ्या जागेत तलवारबाजी करणारा नाही.छत्रपती शिवाजी महाराजांची, माझ्या आई-वडिलांच्या नावाने शपथ घेतली तर इंगळ्या का ढसाव्यात असा टोला लगावत, जर हा गुन्हा असेल तर तो करणार असा इशारा त्यांनी दिला. छ. शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. आणि जो आपल्या दैवताला मानत नाही, आई-वडिलांना मानत नाही तो जगाण्याच्या लायकीचा नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपावर प्रहार केला.अभिमान वाटावा असा महाराष्ट्र घडवायचा आहे असे सांगतानाच येथे आल्यावर कळले की, यापेक्षा मैदानाच बरं असे म्हणत त्यानी भाजपावर टीका केली.