अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी !
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात तत्कालीन जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना एसीबीकडून क्लीनचीट मिळाली आहे. त्यामुळे येत्या सोमवारी होणा-या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर चर्चा करण्यासाठी नेहरु सेंटरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज शुक्रवारी तब्बल दीडतास चर्चा झाली.येत्या १६ डिसेंबर पासून नागपूर येथे सुरू होणा-या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात तत्कालीन जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना एसीबीकडून क्लीनचीट मिळाली असल्याने अजित पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या सोमवारी होणा-या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये ठरल्याप्रमाणे शिवसेनाला मुख्यमंत्रीपद, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा तिन्ही पक्षांच्या आमदारांचा आग्रह आहे. त्यामुळे येत्या सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो.