येत्या सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार ?

येत्या सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या सोमवारी म्हणजेच ९ डिसेंबरला होणार असल्याची चर्चा आहे.या विस्तारात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील कोणाचा समावेश केला जाईल हे गुलदस्त्यात असले तरी शपथविधी राजभवनात पार पडणार असल्याचे समजते.मुख्यमंत्र्यासह सहा मंत्र्यांचा शपथविधी झाला असला तरी तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचे खाते वाटप रखडलेले आहे.या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटपावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात नेहरु सेंटरमध्ये बैठक झाली आहे.या बैठकीत खाते वाटपासोबतच मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यात आली. आजच्या बैठकीमुळे खाते वाटप  विस्तारानंतर जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

 २८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई छगन भुजबळ व नितीन राऊत या सहा मंत्र्यांचा शपथविधी सोहळा शिवतीर्थावर पार पडला. या शपथविधी नंतर लगेच मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर केले जाईल अशी चर्चा होती. मात्र आठ दिवसांचा कालावधी उलटून गेला असला तरी खाते वाटप जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे सहा मंत्र्यांचे खाते वाटप रखडलेले आहे.याच पार्श्वभूमीवर आज संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात नेहरु सेंटरमध्ये बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई तर राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील उपस्थित होते.या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर चर्चा करण्यात आली असून, मंत्र्यांचे खाते वाटप विस्तारानंतर जाहीर केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या बैठकीत संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यात आली असून, मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या सोमवारी म्हणजेच ९ डिसेंबरला केला जाणार असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी दिली जाईल हे गुलदस्त्यात असेल तरी नव्या मंत्र्यांचा शपथविधी राजभवनावर पार पडणार आहे.

 महाराष्ट्र विकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांमध्ये सत्ता वाटपाचे सूत्रही निश्चित झाले आहे. मात्र काही महत्वाच्या खात्यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये घोळ असल्याने त्यावर निर्णय होवू शकला नव्हता. सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री व सहा मंत्र्यांना शासकीय बंगल्यांचे व मंत्रालयातील दालनांचे वाटप करण्यात आले आहे. येत्या १६ डिसेंबर पासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे सांगितले जात होते.शिवसेनेची संभाव्य मंत्र्यांची यादी तयार असल्याची चर्चा आहे.मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधिल खात्यांचा घोळ मिटलेला नव्हता.अजित पवार यांचा मंत्रिमंडळातील समावेश हा कळीचा मुद्दा झाला आहे.अजित पवार यांच्या समावेशावर लवकरच शिक्कामोर्तब करण्यात येवून राष्ट्रवादी आणि काँग्रेसची यादी येत्या दोन दिवसात अंतिम होवून येत्या सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याचे समजते.

 

Previous articleतीन वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या
Next articleअजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी !