अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला… भुजबळ काय म्हणाले !
मुंबई नगरी टीम
पुणे : येत्या १६ डिसेंबर पासुन सुरू होणा-या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल अशी चर्चा होती. मात्र आता मंत्रिमंडळाचा विस्तार हा अधिवेशनानंतरच होणार असल्याचे भाकित राष्ट्रवादीचे नेते आणि ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी वर्तविले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे,हिवाळी अधिवेशन संपताच दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे ते म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ पुणे येथे माध्यमांशी बोलत होते.त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.राज्यात यापूर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून संपुर्ण अधिवेशनाचे कामकाज पार पाडले होते.आता मुख्यमंत्र्यांसह आम्ही सहा मंत्री असल्याने हिवाळी अधिवेशनाचे कामकाज करताना कसलीही अडचण भासणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.उगाचच लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले. २८ नोव्हेंबर रोजी शिवतार्थावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर इतर ६ नेत्यांनी मंत्रीपदांची शपथ घेतली. मात्र या शपथविधीला १० दिवसाचा कालावधी उलटून गेला तरी अजून खातेवाटप करण्यात आले नाही.तर मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबणीवर पडल्याने आमदारांचा जीव टांगणीला लागला आहे.
भुजबळ म्हणाले,मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे,नागपूरला होणारे हिवाळी अधिवेशन संपताच अगदी दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.खाते वाटपही एकाच वेळी करण्यात येईल असेही भुजबळ यांनी सांगितले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव अतिशय चांगला आहे. गेल्या २५ वर्षांपासून त्यांची आणि माझी ओळख आहे.शिवसेनेत असताना आम्ही एकत्रित काम केले आहे.त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव चांगला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्पष्ट वक्ते आहेत. खरे बोलणारे आहेत. एखादी गोष्ट पटल्यानंतर तातडीने निर्णय घेतात. असे जर खुलेपणाने बोलणारे नेते असतील तर ते आपल्याला अधिक आनंद होतो असेही भुजबळ यांनी सांगितले.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की,शरद पवारांना भाजपाबरोबर जायचे असते तर ते सर्व आमदारांना घेऊन गेले असते. त्यांच्या मनात तसे काही असते तर त्यांनी सांगितलं असते, मात्र तसे काही नव्हते.पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय अगोदरच घेतला होता.काँग्रेसला विश्वासात घेऊन नंतर शिवसेनशी चर्चा केली.किमान समान कार्यक्रमाची निश्चिती झाल्यानंतर आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अजित पवार यांना शरद पवार यांनी काही सांगण्याचा संबंध येतच नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले. २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर शिवसेना,राष्ट्रवादी आणि कांग्रेसच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रीपदांची शपथ घेतली.शपथविधी होवून १० दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप खाते वाटप झाले नसल्याने विरोधकांनी सरकारला लक्ष केले आहे. आज भुजबळांनी सांगितल्यानुसार मंत्रिमंडळाचा विस्तार हा अधिवेशनानंतर होणार असल्याने इच्छूक आमदारांना अजून काही दिवसांची प्रतिक्षा करावा लागणार आहे.तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षात मंत्रीपदांबाबत रस्सीखेच सुरु असल्यामुळे खातेवाटपला मुहूर्त मिळत नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.