मला उपमुख्यमंत्री करावं हि कार्यकर्त्यांची इच्छा : अजित पवार
मुंबई नगरी टीम
सोलापूर : महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये मला उपमुख्यमंत्री करावं अशी इच्छा कार्यकर्त्यांची आहे असे सांगतानाच,हा निर्णय पक्षाचे प्रमुखच घेतील असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात सत्तापेच सुरू असताना सकाळी सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्ष नेते अजित पवार यांची पुन्हा एकदा भेट झाल्याने चर्चांना उधाण आले. मात्र हि भेट राजकीय नव्हती तर करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नात झाली असे पवार यांनी स्पष्ट केले.लग्न सोहळ्यात हे दोन नेते शेजारी बसून चर्चा करताना दिसत होते.या दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र या भेटीत विरोधी पक्ष नेते फडणवीस यांच्याशी काय बोलणे झाले याबद्दल पवार यांनी खुलासा केला. यावेळी मी त्यांना हवा पाण्याबाबत चौकशी केली असे त्यांनी सांगितले.राज्यातील सरकारमध्ये आपली उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याबाबत विचारले असता,मी उपमुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.पण याबाबत पक्ष प्रमुखच निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले.मंत्रिमंडळातील खाते वाटप आणि सिंचन घोटाळ्याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला.