हिवाळी अधिवेशन एकच आठवडा चालणार
मुंंबई नगरी टीम
मुंबई : येत्या 16 डिसेंबर पासून नागपूर येथे सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे एकच आठवडे चालणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे.विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाज सल्लागार समितीमध्ये विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील कामकाजावर चर्चा करण्यात येवून कार्यक्रम अंतिम करण्यात आला.
कामकाज सल्लागार समितीची बैठक आज विधानभवनात पार पडली.आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा करण्यात आली.येत्या 16 तारखेपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होणार आहे.हे अधिवेशन केवळ एकच आठवडा चालणार आहे.या अधिवेशनात पुरवणी मागण्या,अशासकीय कामकाज,शासकीय विधेयके,राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आदी कामकाज होणार आहे.तर विधान परिषदेत 7 अशासकीय विधेयकांवर चर्चा होणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्रातील शरद बोबडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.विधानसभा सल्लागार समितीच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे,सुभाष देसाई,जयंत पाटील,बाळासाहेब थोरात,आमदार चंद्रकांत पाटील,गिरीष महाजन,आशिष शेलार,अमिन पटेल,दिलीपवळसेपाटील,सुधीर मुनगंटीवार,विजय वड्डेटीवार,सुनील प्रभू आदी उपस्थित होते.तर विधानपरिषद कामकाज सल्लागार समिती बैठकीस उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,मंत्री एकनाथ शिंदे,सुभाष देसाई,आमदार विजय ऊर्फ भाई गिरकर,हेमंत टकले,डॉ. रणजित पाटील,शरद रणपिसे,सुरजितसिंह ठाकूर,भाई जगताप,अनिल परब,जयंत पाटील,रामहरी रुपनवर आदी उपस्थित होते.
दरम्यान नागपुरात होणारे अधिवेशन हे किमान दोन आठवडे घ्यावे अशी मागणी विरोधकांनी केली मात्र हि मागणी फेटाळण्यात आली . शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, ती तातडीने मिळावी ही आमची अपेक्षा आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.अधिवेशन केवळ पाच दिवसाचे आहे, हे अधिवेशन सोपस्कार पूर्ण करण्यासाठी आहे असे फडणवीस यांनी सांगून,अजून मंत्र्यांचे खाते वाटप झाले नाही.मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे अधिवेशनात उत्तरे कोण देणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.