महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई करा

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई करा

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालक कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.

महिलांवरील अत्याचारबाबत कठोरात कठोर पावले उचलण्यात यावीत, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र पोलीस दलाच्या कामाची वाखाणणी नुकत्याच पार पडलेल्या देशातील पोलीस महासंचालकांच्या परिषदेत झाली. महिला अत्याचाराच्या प्रकरणात तत्काळ व जलद कार्यवाही करून गुन्हेगारांना वचक बसेल असे काम करावे.मागील काही कालावधीत निर्भया फंड मधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. ह्या निधीचा तत्काळ कशा पद्धतीने त्वरित विनियोग करता येईल, याची कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी ज्या ज्या आवश्यक असतील त्या सर्व सुविधा शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येतील. आपल्या सरकारला खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचा आहे, असा संदेश ठाकरे यांनी पोलीस दलाला दिला.सर्वसामान्य नागरिकाला पोलीसांविषयी आदर आणि त्याचबरोबर दरारा वाटेल अशा पद्धतीने काम करावे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, काही वेळा न्याय्य मागण्यांसाठी सर्वसामान्य नागरिक अहिंसात्मक मार्गाने रस्त्यावर उतरतात. अशा वेळी नोंदविण्यात आलेले गंभीर गुन्हे वगळता सध्या स्वरुपाचे गुन्हे काढून घेण्यासाठी सकारात्मक पावले टाकावित. अतिशय आवश्यक असेल तेव्हाच बळाचा वापर केला पाहिजे. पोलीसांमुळे नागरिकांचे सण- उत्सव आनंदात पार पडतात, असेही गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत. त्याला तत्काळ मान्यता देण्यात येईल. पोलिसांच्या घरांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, कर्तव्य कालावधीचे प्रश्न, कर्तव्य सहजतेने पार पाडता येतील यासाठीच्या सुधारणांसाठी प्रयत्नशील राहू.मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून त्याकडे जगाचे लक्ष असते. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच शहराच्या सुरक्षिततेसाठी सतत सतर्क रहावे, अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या.

Previous articleहिवाळी अधिवेशन एकच आठवडा चालणार
Next articleमी नाराज असल्याची बातमी चुकीची: एकनाथ खडसे