रामदास आठवले म्हणाले ‘मलाही मुख्यमंत्री व्हायचंय’ ! अजितदादा मुख्यमंत्री होणार की नाही आठवलेंनी स्पष्टच सांगितले

मुंबई नगरी टीम

सांगली । सध्या भावी मुख्यमंत्री कोण यावरून मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी सुरू आहे.राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नावाचे भावी मुख्यमंत्री म्हणून काही शहरात पोस्टर लावण्यात आले आहेत तर नागपूरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आले आहेत.राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मुख्यमंत्री असावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. या भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीवरून आणि फलकबाजीवरून केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी या ‘मलाही मुख्यमंत्री व्हायचे आहे’ असे सांगून त्यांनी भावी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले सध्या सांगली जिल्ह्याच्या दौ-यावर असून,त्यांनी आज दिवसभर विविध कार्यक्रमांना हजेरी लावली.यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भावी मुख्यमंत्र्यांवरून लागलेल्या चढाओढीवर भाष्य केले.राज्याच्या विविध भागात भावी मुख्यमंत्री अशी फलकबाजी करण्याची स्पर्धा लागली आहे.त्याचा त्यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. भावी मुख्यमंत्री म्हणून होत असलेली फलकबाजी हास्यास्पद आहे.मलाही मुख्यमंत्री व्हावे असे वाटते, पण त्यासाठी आपली ताकद असेल तरच हे शक्य आहे, असे सांगण्यासही आठवले विसले नाहीत.विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका मुलाखतीत आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली.त्यावर बोलताना आठवले म्हणाले,सध्याच्या परिस्थिती विरोधी पक्ष नेते असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना त्यांच्या गटातून संधी मिळण्याची शक्यता वाटत नाही, आणि आम्हालाही त्यांची आवश्यकता नाही.राष्ट्रवादीत मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार आणि व सुप्रिया सुळे यांच्यात सध्या चढाओढ आहे. मात्र,जोपर्यंत मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आहेत तोपर्यंत अन्य कोणाला संधी मिळणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता भाकरी फिरवण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यावरही आठवले यांनी खुमासदार शब्दात उत्तर दिले. आता शरद पवार यांनी ठोस निर्णय घ्यायला हवा आणि एनडीएसोबत यायला पाहिजे.शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत.त्यांना मोठा अनुभव आहे.मी एनडीएसोबत असल्याने शरद पवार यांनीही एनडीएसोबत यायला काय हरकत आहे ? असा सवालही त्यांनी केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत आणि ते सुसंस्कृत सुद्धा आहेत.ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर करीत असलेली टीका अयोग्य असल्याचेही आठवले यावेळी म्हणाले.

Previous article‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
Next articleमॉरिशसमधील उद्योजकांपुढे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली महाराष्ट्राची बलस्थानं