आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांनी घेतली खासदार संभाजीराजेंची भेट

मुंबई नगरी टीम

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांनी  मंगळवारी भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांची भेट घेतली.आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होऊ नये. आपण सर्व एक कुटुंब आहोत.मराठा आरक्षणाचा प्रश्न हा इतर समाजाला विश्वासात घेऊन सोडवला जावा, अशी आपली सुरुवातीपासून भूमिका असल्याचे संभाजीराजे म्हणाले.तर मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात सहकार्य करण्याचा शब्द ओबीसी नेत्यांनी यावेळी दिला.

माजी खासदार हरीभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीच्या शिष्टमंडळाने आज सभाजीराजेंची भेट घेतली.”छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिले. त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. माझी सुरुवातीपासून हीच भूमिका आहे. माझा आजही हाच प्रयत्न आहे की, सर्व बहुजन समाजाला कसे एकत्र आणता येईल. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा इतर समाजाला विश्वासात घेऊन सोडवला जावा, अशी माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे. आरक्षणाचा पेच  सोडवण्यात सहकार्य करण्याची भूमिका घेण्याचा शब्द ओबीसी नेत्यांनी दिला. त्यांच्या या भूमिकेचा मला आनंद आहे”, असे संभाजीराजे म्हणाले.

तसेच ओबीसी आणि मराठा समाजातील लोकांनी एकत्र येत यावर मार्ग कसा काढता येईल यासाठी प्रयत्न करावा, असेही संभाजीराजे म्हणाले. दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. अशातच ओबीसी समाजाने आपल्या आरक्षणात मराठा समाजातील वंचितांना सामावून घ्यावे, अशी चर्चाही समोर आली होती. त्यामुळे दोन्ही समाजात कोणताही वाद न होता मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, अशी दोन्ही समाजातील नेत्यांची भूमिका आहे. संभाजीराजेंनी याच भूमिकेचे स्वागत करत ओबीसी नेत्यांचे आभार मानले आहेत.

Previous articleविधानपरिषदेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज पाठवण्याचे आवाहन
Next articleमध्यावधी निवडणूका घ्यायच्या असतील तर राजभवनात जाऊन भेटा